शासकीय गोदामातील पावणेदोन कोटींच्या ज्वारीची सव्वादोन लाखांत विक्री
गोदामातील 11 हजार क्विंटल ज्वारीचे झाले पीठ.
प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शासनाला खूप मोठा भुर्दंड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, 10 जानेवारी:- जिल्ह्यातील आधारभूत किंमत योजने अंतर्गत 4 वर्षांपूर्वी शासनाने 14,904 क्विंटल ज्वारीची खरेदी 1570 रुपये दराने केली होती. मात्र, या साठवून ठेवलेल्या ज्वारीच्या वितरणाचे नियोजन प्रशासनाने न केल्याने गोदामातील साठवलेल्या ज्वारीचे पीठ झाले आहे. आता हे पीठ अखाद्य असल्याने केवळ सव्वादोन लाखांत प्रशासनाने विक्री केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शासनाला खूप मोठा भुर्दंड बसला आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांकडून आधारभूत किंमत योजनेंतर्गत 2015-16 साली 1570 रुपये दराने ज्वारीची खरेदी करण्यात आली होती. खरेदी केलेली ज्वारीची जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शिटाकळी, बाळापूर व तेल्हारा येथील शासकीय गोदामांमध्ये साठवून ठेवण्यात आली होती. या ज्वारीच्या वितरणाची व्यवस्था प्रशासनाने न केल्याने गोदामातील ज्वारीचे अक्षरशः पीठ झाले आहे. या पिठाचीच आता केवळ 22 रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे.

या संदर्भात भारतीय अन्न महामंडळाने परवानगी न दिल्याने या ज्वारीचे वितरण झाले नसल्याचा आरोप जिल्हा पुरवठा विभागाचा आहे. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल 1 कोटी 70 लाख 45 हजार 490 रुपयांची 10857 क्विंटल ज्वारी केवळ 2 लाख 38 हजार 854 रुपयाला विक्री केल्या जात आहे. या विक्रीमुळे शासनाचे 1 कोटी 68 लाख 6 हजार 636 रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गोदामातील उर्वरित ज्वारीचे पीठ झाल्याचे दिसून येत असले तरी त्याबाबत तपासणीसाठीचे नमुने पुण्याला पाठविल्याची माहिती मिळाली आहे. शासनाचा मोठा महसूल तर या प्रकाराने बुडालाच आहे सोबतच गरिबांच्या तोंडचा घासही दोषींनी हिरावला आहे. या प्रकरणी दिरंगाई करणारे नेमके कोण त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल का? राजकीय व सामाजिक संघटनांची याबाबत चुप्पी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Comments are closed.