गडचिरोली जिल्ह्यात तीन केंद्रावर कोरोना लसीकरणाचे प्रात्यक्षिक यशस्वी
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे हस्ते शुभारंभ.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली,दि.08 जानेवारी :- जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबाबत तीन ठिकाणी पुर्वतयारी म्हणून यशस्वी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग लसीकरण असून त्याकरीता पुर्वतयारी सुरु झालेली आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र बोदली, ग्रामीण रूग्णलय धानोरा येथे कोविड लसीकरण प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी लसीकरण प्रात्यक्षिकाची प्रत्यक्ष पाहणी करुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक ठिकाणी 25 आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले व त्यांच्यासोबत प्रात्यक्षिक पुर्ण केले. यावेळी लसीकरणाचा डोस देणे वगळता सर्व प्रक्रियांचे प्रात्यक्षिक पुर्ण करण्यात आले.
लसीकरणावेळी आवश्यक तयारी घ्यावयाच्या खबरदारी याबाबत प्रात्यक्षिकावेळी माहिती उपस्थित आरोग्य आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यावेळी एका लसीकरण बुथवर 900 लोकांना एका दिवसात लस दिली जाणार आहे. सुरुवातीला जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आज झालेल्या प्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष लस टोचणे सोडून सर्व प्रकारचे प्रात्यक्षिके पुर्ण करण्यात आली. यामध्ये ऑनलाईन लाभार्थ्यांची नावे अपलोड करणे याचा सुद्धा समावेश होता. या लसीकरण कक्षात सॅनिटायझर, प्राथमिक तपासणी, नोंदणी, प्रतिक्षा कक्ष, प्रत्यक्ष लसीकरण कक्ष व देखरेख कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. त्याची तयारी यावेळी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी यांचे बरोबर आरोग्य विभागाची चर्चा झाली. यामध्ये प्रत्यक्ष लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर जसे की, पोलिस, अग्नीशमन दल, महसूल यंत्रणा आदी विभाग, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील पूर्व व्याधींग्रस्त नागरिक आणि चवथ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सर्वांनी अतिशय उत्तम काम केले यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष लसीकरणासाठी जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व जण एक टीमवर्क म्हणून काम करणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येईल. यासाठी जिल्ह्यात उपविभागीय तसेच तालुका स्तरावर संपूर्ण सुरक्षेचे पालन व पारदर्शक अंमलबजावणीसंदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. नागरिकांनीसुध्दा शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येणा-या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मिडीया किंवा इतर माध्यमातून पसरविण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. याच अनुषंगाने गडचिरोली जिल्हा येथील कोविड लसीकरण कार्यक्रमाचे रंगीत तालीम (Dry Run), शुक्रवारला ठीक 10.30 वाजता करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोलंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ.बागराज धुर्वे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ.मुकुंद ढबाले, डॉ.पंकज हेमके, डॉ. इंद्रजित नागदेवते, डॉ. अनुपम महेशगौरी, विनोद देशमुख व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments are closed.