जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा उत्साहात समारोप; पाणी योजनांची अंमलबजावणी गरजेची – डॉ. कावळे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: “जलव्यवस्थापनासाठी आखण्यात आलेल्या योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत,” असे स्पष्ट मत गोंडवाणा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी मांडले. गोंडवाणा विद्यापीठाच्या सभागृहात जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित “जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५” च्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी गिरीपुंजे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सविता सादमवार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अर्जुनवार, मनोहर हेपट व राहुल गुळघाने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राहुल मोरघडे यांनी सांगितले की, “जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याच्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. कालवे स्वच्छ ठेवणे, पाण्याचा शेवटचा थेंब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट होते.”
सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सविता सादमवार यांनी “जलसंवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहून जबाबदारीने योगदान देणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले.
जलजागृती पंधरवाड्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण शाखा अभियंता राहूल दाभाडे यांनी केले. पंधरवाड्यादरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यांनाही जलसंपदा विभागाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले. यावेळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता अमित डोंगरे, उपविभागीय अभियंता संतोष वाकोडे, महिपाल मेश्राम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.