भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : सुमारे १४० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असूनही प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या कक्षेत घेण्याची किमया आपल्या भारतीय राज्यघटनेने साध्य करुन दाखविली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या आपल्या राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील १० लाख घरात शासन पोहचविणार आहे. यातून लोकशाहीचे मूलतत्त्व व कर्तव्यतत्पर नागरिकत्वाचा पाया भक्कम होईल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत घर घर संविधान या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, बी वैष्णवी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जागतिक पातळीवर भारताने साध्य केलेले यश हे आपल्या संवैधानिक मूल्यांवर साध्य केले आहे. अनेक देशांकडून भारतीय संविधानाचा अभ्यास केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाशी प्रत्येकाने कटिबध्द होण्याचे आवाहन करुन विकसीत भारताचा संकल्प जाहीर केला आहे. संविधानातील मूल्यांवर आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत सर्वोत्तम राज्य करु असा निर्धार मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या कर्तव्यतत्पर भूमिकेतून भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या भारतीय राज्यघटनेची उद्देशिका घराघरात पोहचविण्याचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातून व या दीक्षाभूमीतून होत असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबबिल्या जाणाऱ्या या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी स्वयंस्फूर्त पूढे येऊन सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
Comments are closed.