“क्या हुआ तेरा वादा?” — राकांपाचं सरकारविरोधी एल्गार रस्त्यावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात मोठे मोठे आश्वासन देण्यात आले होते.मात्र त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने “क्या हुआ तेरा वादा?” – हा सवाल आता गडचिरोलीच्या अहेरीतील रस्त्यांवर घसरणाऱ्या चाकांइतकाच धारदार झाला आहे. निवडणूकांचे दिवस होते, राजकीय पक्षांचे नेते आश्वासनांच्या आतषबाजीत व्यस्त होते, आणि जनतेला वाटत होते की कदाचित यावेळी त्यांच्या भाग्याला उजाळा मिळेल. पण सत्ता आल्यानंतर सत्ताधाऱ्यांचं लक्ष जनतेच्या वेदनेकडे नाही, तर खुर्चीच्या स्थैर्याकडे वळतं, हे पुन्हा एकदा ठसठशीतपणे उघड झालं आहे.
अहेरी उपविभागातील जर्जर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेतृत्वात जनतेने अहेरीच्या मुख्य चौकात आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ३१ मार्चपूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि त्याच आधारावर आंदोलन मागे घेण्यात आलं. पण एप्रिल, मे आणि आता जून संपत आला, तरी रस्त्यांवर खड्डेच आहेत – विकासाचे कुठलेच ठसे नाहीत. हा फसव्या आश्वासनांचा खेळ आहे, आणि त्याविरुद्धच आता “क्या हुआ तेरा वादा?” या घोषवाक्याखाली पुन्हा एकदा सोमवार, २३ जून रोजी आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे आंदोलन केवळ रस्त्यांपुरतं मर्यादित न राहता, सरकारच्या विस्मरणातील योजनांवरही बोट ठेवणार आहे. ‘लाडली बहिण योजना’च्या बाजूने ‘निराधार योजना’तील लाभार्थ्यांना सध्या मिळणाऱ्या अल्प अनुदानात वाढ करून ती रक्कम दरमहा २१०० रुपये करण्याची प्रमुख मागणी असून, त्याही योजना कागदांपुरत्या असल्याचा आरोप आत्राम यांनी केला. ग्रामीण जनतेला मूलभूत सुविधा मिळण्यात वारंवार दिरंगाई होत असताना, सरकार विकासाचे गोडवे गात बसले आहे, ही बाब केवळ त्रासदायक नव्हे तर धोरणात्मक फसवणूकच आहे.
या पत्रकार परिषदेत राकांपाचे विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, श्रीनिवास विरगोनवार, नगरपंचायत सदस्य अमोल मुक्कावार, जहीर हकीम, अफसर पठाण, हिमायत अली आणि स्वप्निल श्रीरामवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. जनतेच्या सोसण्याची परीमिती आता संपत आली आहे. रस्त्यांच्या खड्ड्यांमधून उसळणारी धूळ आता शासनाच्या अपयशावरच शिक्कामोर्तब करते आहे. आणि म्हणूनच, हे आंदोलन केवळ रस्त्यांच्या दुरुस्तीपुरते मर्यादित न राहता, शासकीय बेफिकिरीविरुद्धचा लोकशक्तीचा हुंकार ठरणार आहे, हे निश्चित.
Comments are closed.