कोरोनाबाबत सगळेजण निश्चिंत झाले असतानाच मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
- दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई डेस्क, 4 फेब्रुवारी : कोविडचे लसीकरण वेगाने सुरु आहे परंतू ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग पसरत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्या वेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटीमुळे) आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे असे जर आपण मानत असूत तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती देताना सांगितले की, युकेमध्ये 20 जानेवारी या एकाच दिवशी 1820 मृत्यू झाले तर ब्राझीलमध्ये दररोज 1 हजार मृत्यू होत आहेत. ब्राझीमध्ये दररोज 50 हजार रुग्ण आढळत आहेत. जून -जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. पण चार पाच महिन्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो की 70 टक्के संसर्ग जास्त पसरविण्याची क्षमता असलेला होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे तर 40 टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात इतका धोकादायक आहे असे आढळल्याचे सांगितले.
सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे. कारण केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथिल केले असले आणि महाराष्ट्रात देखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले असले तरी आपण महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठविणार नसून काळजीपूर्वक जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
अजूनही परदेशातून येणारे प्रवाशी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहोचत आहेत, याबाबत केंद्राला पत्रव्यवहार केला आहे. पण आणखी एकदा विनंती करून प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावे असे सांगणार असल्याचंही ते म्हणाले.
Comments are closed.