Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारत- पाक सीमेवर उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे दिमाखदार पूजन

पुण्याई पुरस्कार वितरण सोहळ्यात आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे, 18 मे –  छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणा देत ढोल-ताशाच्या गजरात निघालेली शिवरायांची पालखी… पालखीवर होणारी फुलांची उधळण…वीर पत्नींच्या हस्ते शिवरायांची आरती…बाईकर्स ने शिवरायांना दिलेली मानवंदना..अशा स्फूर्तीदायी आणि भारलेल्या वातावरणात काश्मीरमध्ये उभारण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन आणि आरती करण्यात आली.

आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने पुण्याई पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. यावेळी काश्मीर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १० फूट पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मूर्ति शास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं.देगलूरकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, मार्गदर्शक पंडित वसंतराव गाडगीळ, विश्वस्त अभयराज शिरोळे, यांसह अखिल झांजले, हर्षल दंताळे, शाम दौंडकर, भोला सिंग अरोरा, मोहनसिंग राजपाल, अॅड. मिलिंद पवार उपस्थित होते. रॉयल बुलेटिरियस च्या बाईकर्सने यावेळी बुलेट चालवून मानवंदना दिली. स्वामी ओम ढोल ताशा पथकाने वादन केले. शहीद संतोष महाडिक आणि स्वाती महाडिक यांची कन्या कार्तिकी महाडीक यावेळी उपस्थित होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉ.के.एच. संचेती, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर, दुर्गसंवर्धक श्रमिक गोजमंगुडे, वैशाली व रूपाली हॉटेल प्रमुख विश्वजीत जाधव, पुरातत्त्व विभाग सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने आदी मान्यवरांना पुण्याई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गो. बं. देगलूरकर म्हणाले, धर्म संस्था संरक्षित व्हावी टिकावी यासाठी आपण काय करतो याचा विचार करायला हवा. सनातन धर्म हा सगळ्यात प्राचीन धर्म आहे यामध्ये नित्य नूतन भर पडते आहे. मुलांना केवळ रामरक्षा शिकवून उपयोग नाही तर धर्माचे महत्त्व मुलांना शिकवायला हवे. आपला धर्म आणि देश गौरवान्वित करण्यासाठी महाराजांचे कर्तृत्व आपल्यासमोर पाहिजे. महाराजांसमोर नतमस्तक होऊन मूर्ती घेऊन आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे तरच देश आणि धर्म टिकेल, असेही त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला शोभेल असा हा कार्यक्रम आहे. काश्मीरमध्ये जवानांना प्रेरणा देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुण्यातील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला ही पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. २० व्या शतकात कोणत्याही लोकशाही राष्ट्राला अभिमान वाटावा, असे राष्ट्र शिवाजी महाराजांनी निर्माण केले. छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व हेच भारतीयांचे राष्ट्रीयत्व आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काश्मीरमध्ये भारत – पाकिस्तान सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा- पुण्यातील आम्ही पुणेकर संस्थेची संकल्पना शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत – पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे व आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.

Comments are closed.