नागपुरात दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या महाठगाकडून पोलिसांनी केले एक कोटी जप्त.
- रिअल ट्रेड आणि मेट्रो क्वॉइन या दोन कंपन्याच्या माध्यमातून १५ हजार गुंतवणूकदार गोळा करून त्यांच्याकडून ७० कोटी उकळले.
नागपूर, दि. २४ नोव्हेंबर: मेट्रो व्हिजन बिल्डकॉम व रिअर ट्रेडचे संचालक विजय गुरनुले अँड कंपनीच्या ताब्यातून प्रतापनगर पोलिसांनी ५५ लाख रुपये जप्त केले. त्याच बरोबर त्याचे खाजगी बँक खाते गोठवून ४८ लाख रुपये थांबविले. अशा प्रकारे एक कोटी ३ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
विजय गुरनुले (३९) असे या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. यासोबत जीवनदास डंडारे, अतुल मेश्राम, रमेश बिसेन, अतुल मेश्राम, अविनश महाडोले, राजू माहुर्ले, श्रीकांत निकुरे, ज्ञानेश्वर बावणे आणि देवेंद्र गजभिये याच्यासह आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यातील काही आरोपींचा पीसीआर संपला असून काही पोलिस कोठडीत आहेत. आणखी कोट्यवधींची रक्कम जप्त करायची आहे. आतापर्यंत तक्रारदारांची संख्या ३० झाली आहे.
विजय आणि त्याचे साथीदार जीवनदास, अतुल आणि रमेश यांनी त्रिमुर्ती नगरातील मंगलमुर्ती चौकात मेट्रो व्हिजन बिल्डकॉम व रिअर ट्रेड कंपनी या नावाने २०१५ मध्ये कार्यालय सुरू केले. व्यवसाय वाढत गेल्यानंतर रिअल ट्रेड आणि मेट्रो क्वॉइन या दोन कंपन्या २०२० साली सुरू केल्या. सुरुवातीला भूखंड विक्रीचा व्यवसाय केला. या व्यवसायातही फसवणूक केली. नंतर रिअल ट्रेडच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीतील रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यात येईल. त्याबदल्यात चांगला नफा देण्याचे प्रलोभन त्याने दिले.
त्यांच्याकडून कोट्यवधींची रक्कम हडपली आणि कार्यालय बंद केले. त्याने आपल्या कंपनीचे देशभरात जाळे पसरवले. १५ हजार गुंतवणूकदार गोळा करून त्यांच्याकडून ७० कोटी उकळले. पोलिसांनी कंपनीचे चार बँक खाते गोठविले आहेत. त्याच प्रमाणे विजयचे खाजगी बँक खाते गोठवून ४८ लाख रुपये थांबविले आणि ५५ लाख रुपये जप्त केले आहेत. ही रक्कम १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Comments are closed.