नक्षल चळवळीच्या काळ्याकुट्ट अध्यायाचा शेवट?
अबुझमाडच्या जंगलात मोठा एन्काउंटर; माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसव राजू ठार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली / रायपूर, २१ मे : छत्तीसगडच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अबुझमाड जंगलात आज सकाळी सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या मोठ्या ऑपरेशनमध्ये देशातील नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता आणि माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसव राजू ठार झाला. या चकमकीमध्ये ३० पेक्षा अधिक नक्षलींचा खात्मा झाला असून, नक्षल चळवळीचा प्रवक्ता ‘रुपेश’ही या कारवाईत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही कारवाई केवळ एक सैनिकी यश न ठरता, भारतीय संविधानाच्या विरोधात सशस्त्र संघर्ष रेटणाऱ्या चळवळीच्या नेतृत्वावर झालेला निर्णायक घाव मानला जात आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशातील आदिवासी पट्ट्यात गेल्या तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या हिंसक नक्षलवादाचा ‘मेंदू’ आज कायमचा संपुष्टात आला आहे.
तपास यंत्रणांची एकत्रित कारवाई, डीआरजीचे यशस्वी ऑपरेशन
अबुझमाड जंगलातील माड डिव्हिजन भागात नक्षल गटाच्या मोठ्या संख्येने हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगडमधील नारायणपूर, बीजापूर, दंतेवाडा आणि कोंडागाव जिल्ह्यांतील डीआरजी (District Reserve Guard) पथकांनी संयुक्तपणे विशेष ऑपरेशन राबवले. आज सकाळी या ऑपरेशनदरम्यान नक्षली गटासोबत जोरदार चकमक झाली.
या चकमकीत देशभरातील सुरक्षा यंत्रणांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला आणि अनेक हत्याकांडांचा मास्टरमाईंड ठरलेला नंबाला केशव राव जागीच ठार ?
कोण होता नंबाला केशव राव? – टेक्नोक्रॅट ते भूमिगत क्रांतिकारी
नंबाला केशव राव उर्फ बसव राजू याचा जन्म १९५५ मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेठ या गावात झाला. त्याने वयाच्या तारुण्यातच टेक्निकल शिक्षण घेत, वारंगल येथील नामवंत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी.टेक पूर्ण केले. मात्र पदवी घेतल्यानंतर तो औद्योगिक क्षेत्रात गेला नाही, तर १९७० च्या दशकात नक्षल चळवळीत सहभागी झाला. त्याला गनिमी कावा, एम्बुश, स्फोटके वापरणे, जिलेटिन बॉम्ब तयार करणे, अशा बाबत विशेष प्रशिक्षण होते. १९९२ मध्ये तो CPI (ML) च्या केंद्रीय समितीवर पोहोचला.
२००४ मध्ये भारतातील अनेक नक्षलवादी गट एकत्र येऊन जेव्हा ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)’ अस्तित्वात आली, तेव्हा नंबाला रावला सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून निवडण्यात आले.
२०१८ मध्ये माओवादी चळवळीचा जुना महासचिव मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने राजीनामा दिल्यानंतर नंबाला रावची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
रक्तरंजित इतिहास : कोणत्या हल्ल्यांचा सूत्रधार होता बसव राजू?
नंबाला केशव राव हे नाव अनेक भीषण आणि धक्कादायक नक्षली हल्ल्यांमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१० दंतेवाडा हल्ला: सीआरपीएफचे ७६ जवान एका एम्बुशमध्ये मारले गेले.
२०१३ झीरम घाटी हल्ला: काँग्रेसचे वरिष्ठ नेते महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल, विद्याचरण शुक्ल यांच्यासह २७ जणांना ठार करण्यात आले.
२०१८ आंध्र-ओडिशा सीमा: तेलगू देसम पक्षाचे आमदार किदरी सर्वेश्वर राव व माजी आमदार सिवेरी सोमा यांची निर्घृण हत्या.या सगळ्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड म्हणून नंबाला रावचं नाव तपास यंत्रणांनी स्पष्ट केले होते.
एक युगाचा अंत – देशातील नक्षल चळवळीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह…
नंबाला रावचा अंत ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, तर संपूर्ण माओवादी चळवळीच्या नेतृत्व व्यवस्थेवर आणि रणनीतीवर झालेला आघात आहे. बसव राजू हा विचार, लष्करी प्रशिक्षण आणि नेतृत्व यांची सांगड घालणारा नेता होता.
त्याच्या मृत्यूनंतर माओवादी पक्षाचे नेतृत्व कोणी घेणार? चळवळीचा मोर्चा कोण हाकणार? यावर सध्या कोणताही स्पष्ट संकेत नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांचा विश्वास आहे की हा हल्ला नक्षल चळवळीला गंभीर हादरा देणारा आहे.
राज्यांच्या यंत्रणांसाठी मोठा आत्मविश्वास..
माओवादी चळवळीने महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये गेली अनेक दशके हिंसा माजवली. मात्र आजच्या कारवाईमुळे एक स्पष्ट संदेश गेला आहे —संविधानाच्या विरोधात हिंसक मार्गाने लढणाऱ्या शक्तींचा कायमचा अंत अटळ आहे.
Comments are closed.