जम्मू काश्मिरात बसस्थानकावर 6 किलो स्फोटकं जप्त
मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जम्मू डेस्क 14 फेब्रुवारी:- पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 2 वर्ष पूर्ण होत असताना जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी जम्मू बसस्थानकावरुन तब्बल साडे सहा किलो इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस अर्थात IED जप्त केलं आहे. त्यामुळे मोठा घातपात टळला.
“गेल्या 3-4 दिवसांपासून आम्ही अलर्ट होतो. दहशतवादी पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते आणि हा हल्ला जम्मू शहरात होणार होता. शनिवारी रात्री पोलिसांनी सोहेल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. तो संशयितरित्या फिरत होता. सोहेल हा अल बदर तनजीम या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याच्याकडे चौकशी करत असताना साडे सहा किलो IED सापडले”, अशी माहिती जम्मूचे आयजी मुकेश सिंह यांनी दिली.
संशयिताकडे चौकशी केली अशता तो नरसिंह कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं त्यानं सांगितलं. तो चंदीगडमध्ये शिकत होता. त्याला पाकिस्तानमधून एक मेसेज आला होता की, या ठिकाणी IED ठेवायचे आहेत. या मेसेजद्वारे IED ठेवण्यासाठी 3-4 जागा सांगितल्या गेल्या होत्या. त्यात रघुनाथ मंदिर, बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार या जागांचा समावेश होता. त्यानंतर त्याला श्रीनगरसाठी प्लाईट घ्यायची होती.
Comments are closed.