Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

25 हजारांची लाच घेतांना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पालघर जिल्ह्यात अधिकारी जोमात आणि जनता कोमात...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, दि. २६ एप्रिल :  पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी २५ हजार रुपये स्विकारताना सानप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगत अडकल्या. सानप यांच्या अटकेमुळे जिल्यातील शिक्षण विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,त्यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी अशी मागणी शिक्षक आणि सामान्य नागरिकांकडून होत आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला. परंतु नव्याने निर्माण झालेला पालघर जिल्हा हा अधिकारी आणि राजकारण्यांसाठी भ्रष्टाचाराचे नवे कुरण मिळाले. महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन तसेच भूमिअभिलेख आणि इतर प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे हे रोज उघड होणाऱ्या लाचखोरी, हप्तेबाजी आणि सार्वजनिक बांधकाम विभागात अशा वेगवेगळ्या विभागांत उघड होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतून दिसून येतं. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याला कार्यालयाच्या बाहेर लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काय आहे नेमकं प्रकरण.
लाचखोर शिक्षणाधिकारी लता सानप यांनी तक्रारदार शिक्षिकेकडे वसई तालुक्यात बदली देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार शिक्षिकेने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लता सानप यांना २५ हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांच्या घरूनच रंगेहात अटक केली.

मालमत्तांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लता सानप सध्या एसीबी च्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या, त्यांचे पागार, शैक्षणिक सामग्री आणि इतर देयके अदा करणे,तसेच इतर प्रत्येक गोष्टींसाठी लता सानप यांना “आर्थिक नैवेद्य चढवावा” लागत होता,असे काही लोक खाजगीत सांगतात. विशेष म्हणजे पालघर जिल्हा हद्दीत असंख्य अनधिकृत शाळा असून या शाळांवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असून देखील लाचखोर शिक्षणाधिकारी लता सानप यांनी लाच घेऊन या अनधिकृत शाळांवर कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे करोडो रुपयांचे घबाड मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालघरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप या नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. त्यांच्यावर सामान्यांसह लोक प्रतिनिधींसोबत देखील अतिशय उद्धट वर्तन करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य यांचा सन्मान ठेवत नसल्याचे आणि उद्धट वागत असल्याच्या कारणावरून त्यांची बदली करावी असा ठराव जिल्हापरिषदेच्या सभेत घेण्यात आला होता. तसेच, नुकत्याच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत समितीने देखील त्याच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत कडक ताशेरे ओढले होते. तरीही सानप यांच्या वर्तणुकीत कुठलाही बदल झालेला नव्हता.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पथकावच्या कारवाईचे कौतुक

लाचखोर लता सानप यांना सापळा रचून, लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक शिक्षण विभागातील कर्मचारी आणि सामान्य नागरिकांकडून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कौतुक होत आहे. एसिबीचे पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार संजय सुतार, नवनाथ भगत, पागधरे, अमित चव्हाण, विलास भोये, मांजरेकर, स्वाती तारवी, सखाराम तोडे यांच्या पथकाने साफळा रचून ही यशस्वी कारवाई केली आहे.

Comments are closed.