Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे पालघरच्या चारोटी जवळ अपघाती निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

प्रतिनिधी: मनोज सातवी

पालघर, दि. ४ सप्टेंबर : यशस्वी उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वयाच्या 54 व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघर येथे चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलावर मिस्त्री यांची कार दुभाजकाला धडकुन भीषण अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर महिला चालक अनयता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी असून त्यांना वापी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सायरस मिस्त्री हे अहमदाबाद वरून मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील चारोटी येथे त्यांच्या कारला दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेली कार डिव्हायडरला धडकली आणि हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा कारमधून सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल, महिला चालक अनयता पंडोल आणि दरीयस पंडोल असे चार जण प्रवास करीत होते. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अनयता पंडोल आणि दरीयस पंडोल या दोघी गंभीर जखमी झाले असून त्यांना वापी येथील रेम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शोक

“टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एकयशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण,उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार असा उद्योजक आपल्यातून गेल्याने उद्योग जगतात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

ब्लॅक स्पॉटमुळे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलावर महामार्गाच्या तीन लेन अचानक दोन लेन होतात. त्यामुळे चालकाला त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्याच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक ब्लॅक स्पॉट असताना देखील एन एच ए आय आणि महामार्गाच्या दुरुस्तीवर देखभालीचे कंत्राटदार कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेकडे मुख्यमंत्री लक्ष देणार का..?

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मीरा-भाईंदर पासून ते थेट गुजरात सीमेपर्यंत महामार्गावर अत्यंत धोकादायक खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. या महामार्गावर रोजच अनेकांचे बळी जात आहेत.

याबाबत प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी देखील या विरोधात आंदोलने तसेच सभागृहात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता सायरस मिस्त्री सारख्या उद्योजकाच्या अपघाती निधनानंतर तरी मुख्यमंत्री या मार्गावर वरील प्रश्नाबाबत गांभीर्याने लक्ष देतील का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

हे देखील वाचा : 

जातीय दंगली घडविणे हा भाजपचा इतिहास आहे! – भास्कर जाधव

 

कु.मीनल दिवाकर रामटेके यांची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड

 

Comments are closed.