Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“जी २० परिषद : सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान”

- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ७ डिसेंबर : जगातील प्रगत राष्ट्रांच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून त्या निमित्ताने राज्याचा विकास आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे. या संदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देऊनही ते बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व देऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना केली.

चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या उच्चस्तरीय संघटनात्मक बैठकीसाठी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. यानिमित्ताने राज्यातील विकासाचे प्रकल्प आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे. जी २० परिषदेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्याला भाजपाखेरीज इतर अनेक प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. परंतु निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण होते. त्यांना काही कारणाने उपस्थित राहता आले नसेल तर पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित रहायला हवे होते. पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या या दोन्ही नेत्यांनी बैठकीस गैरहजर राहून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जी २० संबंधी बैठकीसाठी विविध पक्षांना निमंत्रण होते. बैठकीस भाजपाचे विरोधक असलेले काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल अशा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार गैरहजर राहिले, याविषयी प्रतिक्रिया काय असे विचारले असता मा. प्रदेशाध्यक्षांनी वरील मतप्रदर्शन केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्राला या परिषदेतून खूप काही मिळणार आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार का उपस्थित राहिले नाहीत, हे त्यांनी सांगितले पाहिजे. या बैठकीच्या ऐवजी उद्धव ठाकरे दिवसभर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आणि महाविकास आघाडीची बैठक यात गुंतलेले राहिले. या बैठका नंतरही झाल्या असत्या. महाराष्ट्राच्या हिताच्या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहणे हा राज्याचा अपमान आहे. हे निषेधार्ह आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाविकास आघाडी मोर्चा काढणार असल्याबद्दल विचारले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मोर्चा कशासाठी काढणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तर शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले नाही. त्यावेळी कधी उद्धव ठाकरे यांना निषेध करावासा वाटला नाही आणि आता कशासाठी मोर्चा काढत आहेत ?

हे देखील वाचा : 

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती

महामेट्रो नागपूरला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र

 

Comments are closed.