राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार भारत भालके यांचं निधन.
भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क २८ नोव्हेंबर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्याहून सकाळी सात वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावाकडे पुण्याहून निघेल. सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान टेंभुर्णी मार्गे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मार्गे ते पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
“पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
Comments are closed.