मास्क न घातल्याने २७,७७५ जणांवर कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर डेस्क, दि. १८ नोव्हेंबर: मिशन बिगिन अगेन सुरू झाले असले तरी कोरोना सुरक्षा आणि शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याने तब्बल २७ हजार ७७५ जणांकडून १ कोटी ७४ लक्ष ३५ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन शिथिलीकरणानंतरही राज्य शासनाने नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दिशानिर्देशानुसार मनपाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाने ५ जून ते १५ नोव्हेंबर रोजीपर्यंत तब्बल २७ हजार ७७५ नागरिकांवर कारवाई केली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाजारांमध्ये गर्दी होउ नये यासाठी दुकानांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये दुभाजक नसलेल्या ठिकाणी सम व विषम तारखांनुसारच दुकाने सुरू करण्याची तरतूद आहे. तसेच घराबाहेर कुठेही फिरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्फत देण्यात आले आहेत.
घराबाहेर कुठेही सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावणे बंधनकारक असून नियम न पाळणाऱ्यांकडून सुरूवातीला २०० रुपये दंड आकारण्यात येत होते. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२० पासून दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली. त्यानुसार १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत १४ हजार २०५ जणांवर कारवाई करीत ७१ लक्ष २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी ५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत २०० रुपये याप्रमाणे ११ हजार ६४ जणांवर कारवाई करीत २२ लक्ष १२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
प्रारंभी बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरूवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते. त्यानुसार ५ जून ते १७ जुलै २०२० दरम्यान १३८० दुकानांवर कारवाई करून १ हजार रुपयांप्रमाणे एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपाद्वारे सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करण्यासंदर्भात १७ जुलै रोजी नवीन आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा ८ हजार रुपये व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्यानुसार १८ जुलै ते १७ ऑक्टोबरपर्यंत १ हजार ६४ दुकानांवर कारवाई करीत ५७ लक्ष २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पहिल्यांदा नियम तोडणारे ९७९, दुसऱ्यांदा नियम तोडणारे १२ आणि तिसऱ्यांदा नियमभंग करणाऱ्यां ७३ दुकानांचा समावेश आहे.
कोरोना काळात खासगी हॉस्पिटल्समधील जैव कचऱ्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मनपाच्या निर्देशानंतरही अनेक दवाखाने, रुग्णालयांमार्फत घातक ‘बायोमेडिकल वेस्ट’ सर्वसाधारण कचऱ्यात टाकून त्याची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याचे आढळून आले. त्या ६२ हॉस्पिटल्सवर १ एप्रिल ते १५ नोव्हेंबरपर्यंत मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. या कारवाईमध्ये १० लक्ष १९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
Comments are closed.