Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर एपीआय सचिन वाझेंना १३ तासाच्या चौकशी नंतर अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दिनांक १४ मार्चः मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे.

शनिवार (१३ मार्च) सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ११.३० वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर १३ तासांच्या चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. अखेर NIA च्या प्रदीर्घ चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल
स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेत. गेल्या १५ दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडालेली आहे.

Comments are closed.