Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘मराठी एकजुटीची वज्रमूठ’ – १९ वर्षांनंतर उद्धव-राज एका व्यासपीठावर, सरकारच्या हिंदी सक्तीला प्रतिकाराचा जनस्फोट!

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, दि. ५ : राजकारणात एकमेकांपासून तुटलेले, पण मराठी अस्मितेच्या गर्जनेवर पुन्हा एकवटलेले दोन शिवसिंह—उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे—यांनी तब्बल १९ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावरून सरकारच्या निर्णयांना खुली आव्हानं दिली. वरळीतील डोम सभागृह साक्षी ठरलं, जेथे ‘मराठी’चा आवाज झेंड्यांपलीकडचा ठरला. हिंदी सक्तीविरोधी लढ्याचा हा विजय मेळावा मराठी मनात पुनर्जागरण घडवून गेला.

पावसामुळे शिवतीर्थवर होऊ न शकलेला हा मेळावा वरळीच्या डोममध्ये झाला, पण जनसागराचा उन्मेष इतका प्रचंड होता की सभागृह क्षमतेपलीकडे भरलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अगदी देश-विदेशातून आलेल्या मराठी बांधवांनी ‘मराठी माणूस अजूनही जागा आहे’ हे ठामपणे दाखवून दिलं. जागा न मिळालेल्या शेकडो कार्यकर्त्यांना बाहेर थांबावे लागले, पण त्यांच्या डोळ्यांत एकच भाव होता — ‘आज काहीतरी ऐतिहासिक घडते आहे’.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या विजय मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘मराठी’ हा अजेंडा सर्व झेंड्यांपेक्षा मोठा ठरला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘सन्माननीय’ असा उल्लेख करत भाषणाची सुरुवात केली आणि दोघांतला बर्फ आपोआप वितळल्याचा संदेश दिला. “२० वर्षांनंतर आम्ही एकत्र आलो आहोत, जे आमच्या बाळासाहेबांनाही जमत नव्हतं, ते देवेंद्र फडणवीसांमुळे जमलं,” अशी कोरडी टीका करत त्यांनी सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला जनतेचा ठाम विरोध असल्याचं नमूद केलं.

“सत्ता विधानभवनात असेल, पण रस्त्यावर आजही आमच्याच मुठी वाजतात,” – राज ठाकरे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याच वेळी, उद्धव ठाकरे यांनी व्यंगपूर्ण, परंतु प्रखर भाषेत सरकारवर निशाणा साधला. “आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, आता आम्ही एकत्र राहणार,” असं सांगत त्यांनी ‘भोंदू महाराजां’पासून ‘रेडं कापणाऱ्यां’पर्यंतचे संदर्भ देत टोले लगावले. “हिंदी सक्ती तुमच्या सात पिढ्याही आल्या तरी होऊ देणार नाही,” हा जाहीर इशारा होता — सरकारला नव्हे, तर कोणत्याही अस्मितेवर कुरघोडी करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना.

“आज भाषणापेक्षा आम्ही एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. ही वज्रमुठ कोणत्याही ‘फेकाफेकीच्या’ सरकारला पुरुन उरेल,” – उद्धव ठाकरे

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी समाज पक्षाचे महादेव जानकर, माकप नेते अजित नवले, शेकापचे जयंत पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. मात्र, काँग्रेसचा एकही प्रतिनिधी अनुपस्थित होता, ही बाब उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली.

गणेश वंदनेने सुरुवात झालेला हा कार्यक्रम केवळ भाषणांचा मेळावा नव्हता, तर दोन तुटलेल्या प्रवाहांची अस्मितेच्या दाराशी झालेली पुनर्भेट होती. उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात, घोषणा-जयघोषात आणि डोळ्यांत पाणी आणणाऱ्या संवादात, ही घटना एका ऐतिहासिक क्षणात रूपांतरित झाली.

या मेळाव्याचं अंतिम वाक्य नव्हतं, ते एक प्रारंभ होतं — मराठी स्वाभिमानाच्या नवसंघटनाचं. हे केवळ हिंदी सक्तीविरोधाचं नव्हतं, हे मराठी आत्मसन्मानाचं नवसंस्कार सोहळा होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.