Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना

जुलै 2022 ते जानेवारी 2025 या कालावधीतील जोडप्यांना मिळणार लाभ

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर : सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याचे दृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या व्यक्तीपैंकी एक व्यक्ती व दुसरी सवर्ण हिंदु, लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असेल तर आंतरजातीय विवाहितास लागू करण्यात आलेली आहे.

तसेच या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील आंतरजातीय विवाहाच्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेमध्ये 50 हजार रुपये प्रति जोडपे डीबीटी तत्वावर अनुदान वितरीत करण्यात येते. सदर अनुदान विवाहित जोडप्यांचे मुळ कागदपत्राची तपासणी करून त्यांच्या संयुक्त बँक खात्यावर (पीएफएमएस) PFMS प्रणालीमार्फत डीबीटी द्वारे प्रदान करण्यात येते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सन 2024-25 या वर्षी शासनाकडून 3 कोटी 75 लक्ष निधीची मर्यादा प्राप्त झालेली आहे. जुलै 2022 ते जानेवारी 2025 पर्यंतच्या ज्या आंतरजातीय विवाहित जोडप्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात अर्ज सादर केलेला आहे, अशा सर्व जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगाने नमुद केलेल्या कालावधीत अर्ज केलेल्या विवाहित जोडप्यांनी आपले मुळ जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, संयुक्त बँक खाते पासबुक, इत्यादी कागदपत्रे तपासणी करण्याकरिता विवाहित जोडप्यांनी मुळ कागदपत्रांसह समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे शासकीय सुट्टया वगळता 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.