लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 23 एप्रिल:- ‘चेहरा क्या देखते हो’, ‘ऐसी दिवानगी देखी नहीं कही’, ‘घुंगट की आड से’ यासारख्या नव्वदच्या दशकातील सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकारद्वयी नदीम-श्रवण यांच्यापैकी श्रवण राठोड यांचे निधन झाले. कोरोनावरील उपचार सुरु असताना मुंबईतील रुग्णालयात गुरुवारी रात्री 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या रुग्णालयाचे दहा लाख रुपयांचे बिल थकल्याने त्यांचे पार्थिव मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे.

नदीम सैफी आणि श्रवण राठोड यांनी मिळून अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. ही जोडी त्यांच्या आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे विशेष लोकप्रिय झाली. त्यांनी दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. ‘श्रवणच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नदीम यांनी आज दिली.

66 वर्षीय श्रवण राठोड हे कोरोना पॉझिटिव्ह होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. त्यांच्या मृत्यूचे कारण ऑर्गन फेल्युअर असल्याचे सांगितले जात आहे.

big losscovid dealthmusic industryNadeem Shravanold music