श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर माहितीपटाला समाजमाध्यमांवर अभूतपूर्व प्रतिसाद — गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची नांदी

देव मार्कंडा गेल्या कित्येक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या या मंदिराचा चित्रित आवाज, कलात्मक दृश्यरचना, आणि इतिहासाच्या आर्त सुरात गुंफलेले शब्द — यामुळे ‘श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ हा माहितीपट आज गडचिरोलीच्या हृदयात आणि राज्याच्या श्रद्धेत एक अढळ स्थान निर्माण करत आहे.

गडचिरोली, २७ जुलै :

शतकानुशतके वैनगंगेच्या तीरावर गूढ, गौरवशाली शांततेने उभे असलेले ‘श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ मंदिर आता केवळ श्रद्धेचे नव्हे, तर आधुनिक प्रसारणमाध्यमांतून उजळणाऱ्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक बनले आहे. ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखले जाणारे हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर पुन्हा एकदा जनतेच्या मनामनात ठळकपणे विराजमान झाले आहे — निमित्त आहे ‘श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ या माहितीपटाचे, ज्याने अवघ्या काही दिवसांतच फेसबुकवर तब्बल ५ लाख ५३ हजार व्ह्युव्जचा विक्रम गाठत गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या सांस्कृतिक नवजागरणाला बल दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथील नियोजन भवनात या माहितीपटाचे सन्मानपूर्वक विमोचन झाले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर प्रकाशित होताच या माहितीपटाने समाजमाध्यमांवर लोकप्रियतेचे उच्च शिखर गाठले. केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर भाविकांच्या नजरेतून झिरपणारी श्रध्देची ओल, कलात्मकतेचा अविष्कार आणि ऐतिहासिक वारशाची सांगड – यामुळे हा माहितीपट एका जिल्ह्याच्या ओळखीचा भाग ठरला आहे.

या निर्मितीमागे माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, संचालक डॉ. गणेश मुळे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील विविध मान्यवर प्रशासनिक आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा केवळ औपचारिक नव्हता, तर एका भूगोलाच्या आत्म्याला पुनर्जन्म देणाऱ्या श्रद्धेचा उत्सव होता.

या माहितीपटात केवळ मंदिराचे स्थापत्य वैभव मांडले गेलेले नाही, तर वैनगंगेच्या प्रवाहासारखी शाश्वतता लाभलेली धार्मिकता, नागर शैलीतील शिल्पकला, रामायण-महाभारतकालीन कोरीव वारसा, आणि हजारो भाविकांच्या निस्सीम भक्तिभावाचे भव्य दर्शन आपल्याला अनुभवता येते. महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारच्या उत्सवांनी रंगणारे हे तीर्थक्षेत्र ‘विदर्भाचे खजुराहो’ म्हणावे इतक्या सुबकतेने आत्मसात झाले आहे. नव्या पिढीला आपला सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी हा माहितीपट सेतु ठरत आहे.

सामाजिक माध्यमांवर मिळालेल्या उदंड प्रतिसादातून हे स्पष्ट झाले आहे की, हा माहितीपट केवळ मनोरंजनाचा किंवा दस्तऐवज स्वरूपातील नसून, तो जनमानसात जिल्ह्याच्या ऐतिहासिक ओळखीचा उजाळा देणारा भावनिक दस्तावेज ठरतो. ‘गडचिरोली म्हणजे केवळ नक्षलवाद नाही, तर गडचिरोली म्हणजे मंदिरांचा, परंपरांचा आणि आस्था-आध्यात्म्याचा जिल्हा’ – ही ओळख नव्याने ठळक होत आहे.

याच उपक्रमाला पुढे नेत जिल्हा माहिती कार्यालयाने ‘गडचिरोली ग्लिम्प्स’ या उपशीर्षकाखाली जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय स्थळांवर आधारित माहितीपट निर्मितीचा संकल्प व्यक्त केला आहे. म्हणजेच हा माहितीपट एक ‘शुभारंभ’ आहे — गडचिरोलीच्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा, अस्मितेच्या पुन्हा स्फोटाचा.

गेल्या कित्येक वर्षांपासून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या या मंदिराचा चित्रित आवाज, कलात्मक दृश्यरचना, आणि इतिहासाच्या आर्त सुरात गुंफलेले शब्द — यामुळे ‘श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ हा माहितीपट आज गडचिरोलीच्या हृदयात आणि राज्याच्या श्रद्धेत एक अढळ स्थान निर्माण करत आहे.

“ग्रामपंचायतीला कुलूप, विकासाला खो”