मृत्यू समोर ठाकला, काठीने वाघ पिटाळला! मुलचेराच्या जंगलात गुराख्याचा थरारक लढा

हिंमत असेल तर संकटावरही मात करता येते; वाघाच्या जबड्यातून सुटून गुराख्याने जिंकली मृत्यूशी झुंज!..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : काळ समोर ठाकलेला, डोळ्यांत मृत्यूचे भय आणि क्षणात हवेत उडालेला वाघाचा तीक्ष्ण पंजा… अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या क्षणी अढळ धैर्याचे दर्शन घडवत एका गुराख्याने चक्क हातातील काठीच्या जोरावर वाघाला पळवून लावले! मुलचेरा वनपरिक्षेत्रातील ठाकूरनगरच्या घनदाट जंगलात गुरुवारी घडलेल्या या थरारक संघर्षात गणेश खितीस दास हे रक्ताळलेल्या अवस्थेतही वाघाशी भिडले आणि झाडाचा आसरा घेत मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आले.

पंजा चेहऱ्यावर, पण धीर सुटला नाही!..

गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास गणेश दास हे मुलचेरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५२१ (वन विकास महामंडळ क्षेत्र) मध्ये गुरे चारत होते. दाट झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्या दिशेने झडप घेतली. काही समजण्याच्या आत वाघाचा तीक्ष्ण पंजा थेट गणेश यांच्या चेहऱ्यावर बसला. गाल आणि ओठ फाटल्याने रक्ताची चिळकांडी उडाली. प्राण कंठाशी आले असतानाही गणेश यांनी कणभरही धीर सोडला नाही.

हातातील मजबूत काठी पूर्ण ताकदीने वाघाच्या दिशेने फिरवत त्यांनी जोरदार प्रतिकार केला. काठीचा बसलेला तडाखा आणि अचानक झालेल्या या प्रतिहल्ल्यामुळे वाघ क्षणभर बिथरला. हीच संधी साधून रक्तबंबाळ झालेल्या गणेश यांनी विजेच्या चपळाईने जवळच्या झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला.

झाडावरूनच मोबाईलवरून दिली हाक..

झाडाच्या उंच फांदीवर बसून रक्ताने माखलेल्या हातांनी गणेश यांनी तात्काळ मोबाईल काढून गावातील सहकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकरी आणि वन विभागाची कुमक जंगलाकडे धावली.

वन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) गंजीवाड आणि वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश्वर वाडीघरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून गणेश यांना झाडावरून सुरक्षित खाली उतरवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने चामोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गणेश यांच्या ओठावर, गालावर आणि शरीरावर नख्यांचे गंभीर ओरखडे व जखमा झाल्या आहेत; मात्र योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.

एकाच दिवशी दोन हल्ले; जिल्हा वाघांच्या दहशतीत !…

गडचिरोली जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. गुरुवारी सकाळीच गडचिरोली तालुक्यातील वसा शिवारात मशरूम आणण्यासाठी गेलेल्या बाळू विठ्ठल राऊत (वय ४५) या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात झालेला मृतदेह आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच काही तासांत मुलचेरा भागात गणेश दास यांच्यावर हल्ला झाला. एकाच दिवशी दोन हल्ले झाल्याने जंगलालगतच्या खेड्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

सतर्क राहा’चा सल्ला पुरेसा नाही; गस्त कधी वाढणार?..

पोटाची खळगी भरण्यासाठी शेती आणि गुरे घेऊन जंगलात जाणे ही सीमावर्ती भागातील नागरिकांची रोजची अपरिहार्यता आहे. वन विभाग केवळ ‘सतर्क राहा’ अशा घोषणा, बॅनरबाजी करतात आणि मोकळे होतात; मात्र प्रत्यक्षात संवेदनशील भागात पायदळ गस्त वाढवणे, आधुनिक कॅमेरा ट्रॅप्सद्वारे वाघांच्या हालचाली टिपणे आणि हिंस्त्र श्वापदांचा वेळीच बंदोबस्त करणे यात यंत्रणा तोकडी पडत असल्याची संतप्त भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे…

Gadchiroli tiger issueMulcher tiger attackTiger Attack
Comments (0)
Add Comment