प्रवाशांच्या सेवेसाठी’ की अरेरावीसाठी? अहेरी आगारातील वाहकाची दादागिरी: ‘तक्रार कुठेही करा, मी कोणाला घाबरत नाही!’

कर्तव्यावर असताना प्रवाशांचे बेकायदेशीर चित्रीकरण; मोटर वाहन कायदा, ग्राहक हक्क आणि एसटी महामंडळाच्या आचारसंहितेचा उडाला फज्जा; वाहक सुरज गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेची जीवनवाहिनी ठरलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सध्या काही कर्मचाऱ्यांच्या मुजोर आणि बेलगाम वागणुकीमुळे बदनाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अहेरी आगारातून गडचिरोली–भंडारा या महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये कार्यरत असलेले वाहक सुरज गायकवाड यांनी प्रवाशांशी अत्यंत उद्धट, हिडीस आणि असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “तुम्ही माझं काय वाकडं करणार? तक्रार कुठेही करा, मी कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही माझे नाव सुरज गायकवाड आहे!” असा थेट दम भरत संबंधित वाहकाने प्रवाशांना आव्हान दिल्याने सामान्य प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय? प्रवाशांच्या संयमाचा अंत

गडचिरोली-भंडारा मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वाहक सुरज गायकवाड हे प्रवाशांशी तिकीट वितरण अथवा साध्या संवादादरम्यानही अत्यंत आक्रमक आणि तुच्छतेची भाषा वापरतात. रोजचे कार्यालयीन कामगार, रुग्णालयीन उपचारासाठी जाणारे वृद्ध, महिला आणि विद्यार्थी बसमधून प्रवास करतात. आपल्या नियोजित स्थळी वेळेत सुखरूप पोहोचणे हे प्रवाशांचे मुख्य उद्दिष्ट असल्याने, अनेकदा प्रवासी अशा कर्मचाऱ्यांशी वाद घालणे टाळतात. मात्र, प्रवाशांच्या याच सहनशीलतेला आणि संयमाला संबंधित वाहकाने त्यांची हतबलता समजून अरेरावीची परिसीमा गाठल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

ड्युटीवर मोबाईल चित्रीकरण: गोपनीयता आणि सेवा-नियमांचे उघड उल्लंघन..

वाद सुरू असताना संबंधित वाहकाने स्वतःच्या वैयक्तिक मोबाईलवर प्रवाशांचे चित्रीकरण सुरू केल्याची गंभीर बाब चित्रीकरण करत असलेल्या एका प्रवाशांनी बघून बस व हक्काची कृrता समोर आणली आहे. महामंडळाच्या गणवेशात आणि कर्तव्यावर असताना प्रवाशांवर दबाव आणण्याच्या हेतूने असा व्हिडिओ काढणे हा थेट प्रवाशांच्या वैयक्तिक गोपनीयतेवर (Right to Privacy) घाला आहे.

ऑगस्ट २०२६ मध्ये एसटी महामंडळाने जारी केलेल्या अत्यंत कडक परिपत्रकानुसार, कर्तव्यावर असताना चालक आणि वाहक यांनी रील, व्हिडिओ किंवा सोशल मीडियासाठी चित्रीकरण करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. सेवाशिस्तीचा हा अत्यंत गंभीर भंग मानला जातो. असे असताना, संबंधित वाहकाने महामंडळाचे नियम पायदळी तुडवत प्रवाशांचे चित्रीकरण नेमके कोणत्या अधिकारात केले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कायदे, नियम आणि एसटीची आचारसंहिता काय सांगते?

एसटी बसमधील अशा वर्तनाचा कायदेशीर चौकटीतून विचार केल्यास अनेक गंभीर बाबी अधोरेखित होतात:

  •   ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ (Consumer Protection Act, 2019): एसटी महामंडळाचे तिकीट खरेदी करणारा प्रत्येक नागरिक हा अधिकृत ‘ग्राहक’ असतो. सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानपूर्वक सेवा मिळणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि दमदाटी ही ‘सेवेतील गंभीर त्रुटी’ (Deficiency in Service) ठरते.
  •   मोटर वाहन कायदा, १९८८ (Motor Vehicles Act) व महाराष्ट्र मोटर वाहन नियम, १९८९: कलम २१ आणि २२ अंतर्गत वाहकासाठी विहित केलेल्या नियमांनुसार, प्रवाशांशी सौजन्याने, आदराने आणि नम्रतेने वागणे हे वाहकाचे वैधानिक कर्तव्य आहे. प्रवाशांना धमकावणे अथवा सेवेचा दुरुपयोग करणे हा थेट शिस्तभंगाचा विषय बनतो.

एसटी महामंडळ शिस्त व अपील नियम (ST Discipline and Appeal Regulations): कर्तव्यावर असताना प्रवाशांशी गैरवर्तन करणे, वरिष्ठांची अथवा प्रशासनाची भीती न बाळगता उद्दाम वक्तव्ये करणे आणि सेवेची प्रतिमा डागाळणे, हे नियमभंग ठरून बडतर्फी अथवा निलंबनासारख्या कठोर शिक्षेस पात्र ठरते.

दुर्गम भागातील प्रवाशांची व्यथा: आधीच गैरसोय, त्यात मुजोरीची भर..

गडचिरोलीसारख्या अति दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये एसटी ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नसून सर्वसामान्यांचा जगण्याचा आधार आहे. येथे आधीच खिळखिळ्या झालेल्या बसेस, वेळेवर न सुटणाऱ्या फेऱ्या आणि वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी जर कर्मचारी अशा प्रकारे मुजोरी करत असतील, तर महामंडळाचे अस्तित्व नेमके कशासाठी, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

तातडीने निलंबन करून चौकशी करण्याची मागणी..

अहेरी आगारातील या प्रकाराबाबत एका जागरूक प्रवाशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर भ्रमध्वनीद्वारे तक्रार दाखल केली आहे. संबंधित वाहक सुरज गायकवाड यांच्यावर यापूर्वीही अशा तक्रारी तीनदा झाल्या असल्याची निवृत्त झालेल्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर या कडे चालक आणि वाहक पद असून यांच्यासोबत कर्तव्यावर एकत्र जाण्यास टाळाटाळ करत असल्याचेही सूत्रांनी खात्रीशीर माहिती दिली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती हि तपासले जाणे गरजेचे आहे. केवळ अंतर्गत चौकशीचा फार्स न करता:

  •  वाहकावर सेवा-नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तत्काळ कठोर प्रशासकीय कारवाई (निलंबन) करण्यात यावी.
  •  वादग्रस्त प्रसंगी प्रवाशांवर दबाव आणण्यासाठी काढलेल्या मोबाईल व्हिडिओची फॉरेन्सिक व प्रशासकीय तपासणी व्हावी.
  •  अहेरी आगार व्यवस्थापनाने संबंधित प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल विभागीय नियंत्रकांकडे सादर करावा.

एसटी महामंडळ प्रवाशांच्या खिशातून चालते, कोणाच्या वैयक्तिक मक्तेदारीवर नाही. त्यामुळे ‘तक्रार कुठेही करा’ असे उघड आव्हान देणाऱ्या अशा बेलगाम कर्मचाऱ्यांना आगार प्रशासन पाठीशी घालणार की महामंडळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कठोर पाऊल उचलणार, याकडे आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Aheri ST depoBus driverGadchiroli bus conditionsएसटी महामंडळ महाराष्ट्र
Comments (0)
Add Comment