सागवान तस्करांवर वनविभागाचा घाव; तीन बैलगाड्यांसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त!

कारसपल्ली जंगलात रात्रीची धडक कारवाई; चिराण केलेला सागवान तस्करीपूर्वीच जप्त — तस्करांचा शोध सुरू...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : सिरोंचा वनपरिक्षेत्रातील कारसपल्ली जंगलात सागवान तस्करीविरोधात वनविभागाने धडक कारवाई करत चिराण केलेला सागवान लाकूडसाठा आणि तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन बैलगाड्या जप्त केल्या. कक्ष क्रमांक १३५ मध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे दीड लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सागवान तस्करांचे मनसुबे उधळले गेले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश अंधारे यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाऱ्यांनी रात्री जंगल परिसरात गस्त घालत शोधमोहीम राबवली. यावेळी झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या लपवून ठेवलेल्या तीन बैलगाड्या आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून चिराण केलेला सागवान लाकूडसाठा बाहेर नेण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाने तत्काळ सागवानासह तीनही बैलगाड्या ताब्यात घेतल्या.

कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले; मात्र विभागातील संशयाची सावली कायम…

सिरोंचा परिसरात सागवान तस्करीचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे, याच वनविभागातील आसरअल्ली क्षेत्र सहायक विनोद रामजी गोल्लेवार यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २५ ऑगस्ट रोजीच्या निलंबन आदेशाची माहिती ३१ ऑगस्ट रोजी समोर आली. निलंबनाचे अधिकृत कारण वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी सागवान तस्करीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे पाहिले जात असल्याने वनविभागाच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गोल्लेवार यांचे निलंबन थेट मुख्य वनसंरक्षक स्तरावरून झाल्याने या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या निलंबनाचा सध्याच्या सागवान जप्तीच्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, कारसपल्ली जंगलातील ताज्या कारवाईनंतर सागवान तस्करीची ही साखळी नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, तस्करीमागे कोणाचा सहभाग आहे आणि जप्त बैलगाड्या कोणाच्या आहेत, याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून पुढे कोणाचे नाव समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

गडचिरोली वनवृत्तवन विभाग सिरोंचा
Comments (0)
Add Comment