आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विशेष प्रतिनिधी – एस. चुनारकर,

गडचिरोली : जिल्हा दुर्गम आदिवासी बहुल आणि अनेक आव्हानांनी वेढलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्याची ताकद कमी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अहेरी तालुक्यातील रामपूर (पोस्ट-बोरी) येथील कु. आचल सविता संजय मोहुर्ले यांनी आपल्या कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर निवड मिळवत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा नवा अध्याय लिहिला आहे.

अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे आलेल्या आचल यांनी यशासाठी कोणताही शॉर्टकट न स्वीकारता केवळ मेहनत, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा या त्रिसूत्रीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

आचल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, बोरी येथे झाले. त्यानंतर राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे दिशा एज्युकेशन, वरोरा येथून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स, छत्रपती संभाजीनगर येथून बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथून एम.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

संशोधन क्षेत्रातही उमटवली स्वतंत्र छाप…

विद्यार्थीदशेतच आचल यांनी आपल्या गुणवत्तेची वेगळी ओळख निर्माण केली. राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत कांस्यपदक मिळवत त्यांनी संशोधन क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. बुलढाणा येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवून आपल्या ज्ञानाची आणि संशोधन वृत्तीची झलक दाखवली.

विशेष म्हणजे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी UGC-NET परीक्षा उत्तीर्ण करून शैक्षणिक क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. याच गुणवत्तेच्या बळावर आता त्यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ…

अतिरिक्त कोचिंग किंवा मोठ्या सुविधा नसतानाही केवळ स्वअभ्यास, पुस्तकांवरील विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आचल यांनी मिळवलेले यश ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

साधेपणा, संघर्ष आणि जिद्द यांची सांगड घालत आचल यांनी हे दाखवून दिले आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य ध्येय, प्रामाणिक प्रयत्न आणि शिक्षणाप्रती निष्ठा असेल तर यश निश्चित मिळते.

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून न्यायवैद्यक विज्ञानासारख्या अत्याधुनिक क्षेत्रात पुढे येऊन शासकीय संस्थेत प्राध्यापक पदापर्यंत पोहोचलेली आचल मोहुर्ले यांची वाटचाल ही जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीची सकारात्मक दिशा दर्शवणारी आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहेरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

उत्तुंग भरारी अभ्यासातूनगडचिरोली जिल्ह्यात नाव कोरले आहेमाळी समाजातील शिल्पकारशिक्षण विभागात कुटुंग भरारी गडचिरोली चे नाव पुन्हा शिखरावर..
Comments (0)
Add Comment