दादा.. दारूमुळे संसाराची राखरांगोळी झाली ; महिलांनी मांडली व्यथा

जिल्हाभरात मुक्तिपथ गाव संघटनेतर्फे 'राखी विथ खाकी'

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31ऑगस्ट : शहरातील व गावखेड्यातील अवैध दारूविक्री बंद करा अशी ओवाळणी पोलीस बांधवाला राखी बांधत विविध गाव व शहर संघटनेच्या महिलांनी मागीतली. मुक्तिपथ गाव संघटना व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्यात ‘राखी विथ खाकी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिस दादांना राखी बांधून महिलांनी आपली व्यथा मांडली.

धानोरा पोलीस स्टेशन येथे मुक्तीपथ शहर संघटनेकडून पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आले. सोबतच नवरा दारुडा, पिसाची चणचन, संध्याकाळ झाली की गावात भांडण,  मारामाऱ्या होते, अशी व्यथा मांडत अवैध दारूविक्री बंदीची ओवाळणी पोलिस दादांकडे मागितली. यावेळी पीआय गावंडे,  गायकवाड,  थोरात व पोलीस बांधव उपस्थित होते. पोलीस स्टेशन चातगाव येथे राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आले. परिसरातील अवैद्य दारू विक्री बंद करून महिलांना सुखाचे जीवन जगण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ओवाळणी मागितली. खुटगाव येथील महिलांनी गावात तेलंगणा येथील एक सिंधी विक्री करीत असल्याचे सांगताच प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी टीम पाठवली. याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले.
एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलिस मदत केंद्रात आयोजित कार्यक्रमातून महिलांनी दारूबंदीची ओवाळणी मागितली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अतूल प्रतापसिंग होते. प्रभारी अधिकारी सचिन अरमळ, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पुरी, पीएसआय सुयश ढोले, नेहा हांडे, जी वी कुंदे, तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे, राम तलांडे यांच्यासह मुक्तीपथ गावं संघटनचे 19 महिला सदस्य व 110 पोलिस जवान उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात प्रभारी अधिकारी सचिन अरमळ व सर्व अधिकाऱ्यांनी ‘मी गावातील दारु बंदी करेन’ हे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व भगिनींना ओवाळणी म्हणून माझे वचन आहे. असे वचन दिले. एटापल्ली पोलिस स्टेशन येथे राखी विथ खाकी कार्यक्रम पोलिस निरीक्षक निळकंठ कुकडे यांचे अध्यक्षतेत घेण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक साहेबराव पवळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे, पीएसआय रोहिणी गिरवलकर, 17 वार्डातील 25 शहर संघटन सदस्य व 50 पोलिस जवान उपस्थित होते.
कुरखेडा पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सीआरपीएफचे पीआय धुडसे यांच्या अध्यक्षतेखाली राखी विथ खाकी कार्यक्रम पार पडला. यावेळी शहरासह गावातील महिला, डिके महिला महाविद्यालय कुरखेडा येथील 20 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून दारूबंदी वर चर्चा केली.
अहेरी पोलीस स्टेशन येथे मुक्तीपथ वॉर्ड संघटनेच्या वतीने राखी विथ खाकी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी शहरासह गावातील  दारूविक्रीचे प्रमाण वाढले असून तरुण मुलं व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्य बरबाद करीत आहे. त्याकरिता महिलांनी आपले दैनंदिन त्रासदायक मत व्यक्त केले. शहरातील तसेच खेड्यातील दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पी.आय काळबांडे, पो.उप.नि रोहन जावळे,,बालाजी सोनुने व इतर पोलिस शिपाई उपस्थित होते. उप पोलिस स्टेशन रेपणपल्ली येथे आयोजित कार्यक्रमातून गाव संघटनेकडून पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आले व नवरा दारुडा असल्याची व्यथा मांडली. यावेळी गाव संघटन महिला, पोलिस अधिकारी व कर्मचारी, अहेरी तालुका संघटक राहुल महाकुलकर उपस्थित होते.
देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी विविध वॉर्डातील महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून दादा आमच्या वार्डांचे व गावाचे व्यसनापासून संरक्षण करा, आम्हा बहिणींच्या हाकेला धावून दारू विक्री बंद करून आमचा संसार सुखाचा करण्यास मदत करा, अशी आर्त हाक १० वॉर्डातील महिलांनी दिली. यावेळी आम्हाला ओवाळणीत एक रुपयाही नको पण आमची मागणी पूर्ण करा असे वचन यावेळी घेण्यात आले. या उपक्रमात जुनी वडसा , गांधी वॉर्ड, हनुमान वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, माता वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, हटवार एरिया, तुकूम वॉर्ड, मधुबन कॉलोनी ,विसोरा आणि कोंढाळा येथील महिला उपस्थित होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.