लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 23, सप्टेंबर :- मुंबई – गोवा महामार्ग हा नेहमीच असुरक्षित राहिला आहे. या महामार्गावर वारंवार अपघात होतच असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी ही या मार्गावर पाचवीलाच पूजली आहे. रस्ते सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस भयंकर होत चालला आहे. कधी खड्ड्यांमुळे , कधी मद्यपी वाहन चालकांमुळे, तर कधी वायू गळतीसारख्या घटनांमुळे अपघात हे होतच असतात. मुंबई-गोवा महामार्गावर काल गुरुवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये गॅस होता. अपघातामुळे गॅस लिकेज होऊ लागला होता. त्यामुळे प्रशासनाने त्या पुलावरुन जाणारी वाहतूकच पर्यायी मार्गाला वळवली आहे. ही वाहतूक अद्याप सुरळित झालेली नाही.
गोव्याच्या दिशेने जाणारा एमएच १२ एलटी ६४८८ हा कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदी जाऊन कोसळला. या भीषण अपघातामध्ये चालकाचा बुडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले होते.
उरण जैन पी टीवरून गॅस तज्ज्ञांना पाचरण करण्यात आलं असून त्यांच्या सांगण्यानुसार या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात येईल, असंही सूत्रांकडून समजत आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे, गोव्याला जाणारी वाहतूक ही सध्या पाली मार्गे दाभोळ भांबेडवरून लांजावरून गोवा अशी वळवण्यात आली आहे.
हे देखील वाचा :-
केंद्रीय राखीव पोलीस दल. चे पोलीस महानिरीक्षक यांच्या अहेरी पोलीस कॅम्प चा केला दौरा