लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : माओवादाच्या सावटातून विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाने शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आदिवासी युवक-युवतींना सक्षम करण्याचा उपक्रम अधिक व्यापक केला आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी आणि युवक-युवतींना सायकली, शैक्षणिक साहित्य तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.
पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते अतिदुर्गम भागातील ९० विद्यार्थ्यांना सायकली, तर अन्य विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, कंपास आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याशिवाय टु-व्हिलर रिपेअरिंग आणि फास्टफूड व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी आवश्यक किट देण्यात आले. तसेच तीन बचत गटांना वाद्य साहित्य संचाचे वाटप करण्यात आले.
‘पोलीस दादालोरा खिडकी’अंतर्गत प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून गडचिरोलीतील युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. गडचिरोली पोलीस दल आणि बीओआय आरसेटीच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींना ३० दिवसांचे टु-व्हिलर रिपेअरिंग आणि १२ दिवसांचे फास्टफूड व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.कार्यक्रमाला जिल्ह्यातील ३०० हून अधिक विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक उपस्थित होते.
माओवादी चळवळ संपुष्टात; आता युवकांनी विकासाची वाट धरावी…
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले, “पोलीस आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता संपुष्टात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी उपलब्ध करून दिलेल्या साहित्याचा उपयोग करून स्वावलंबी व्हावे आणि आर्थिक उन्नती साधावी. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.”
१६ हजारांहून अधिक युवकांना रोजगार-स्वयंरोजगार प्रशिक्षण…
‘पोलीस दादालोरा खिडकी’ आणि ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून आतापर्यंत १६ हजार ७०८ युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ, तर १,५४२ नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ७५ सार्वजनिक वाचनालये सुरू करण्यात आली आहेत याशिवाय ४,७९६ विद्यार्थ्यांना स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सुरक्षा रक्षक आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासह विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून आतापर्यंत १४ लाख ९ हजार ५३२ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन, तर युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी बळ मिळाले आहे. माओवादविरोधी कारवाईसोबतच विकास, रोजगार आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले..