चिंतलपेठच्या रवींद्र चुनारकर यांची इंडोनेशियाच्या ‘क्लायमेट इक्विटी लॅब’साठी निवड

वनहक्क, आदिवासी ज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या अभ्यासाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ; गडचिरोलीतील तळागाळातील अनुभव आता जागतिक हवामान न्यायाच्या चर्चेत...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,
अहेरी तालुक्यातील चिंतलपेठच्या ज्या मातीत शिक्षणाची पहिली अक्षरे उमटली, त्याच शिक्षणाने पुढे प्रश्न विचारण्याची दृष्टी दिली; अभ्यासाने त्या प्रश्नांना दिशा दिली आणि क्षेत्रकार्याने त्यांना वास्तवाची जोड दिली.आता बालीत रवींद्र चुनारकर आपले अनुभव मांडतील, तेव्हा त्या अनुभवांमध्ये केवळ चिंतलपेठ नसेल; गडचिरोलीच्या जंगलाशी, जमिनीशी आणि निसर्गाशी पिढ्यान्‌पिढ्या नाते जपणाऱ्या समुदायांचे जगणे, ज्ञान आणि संघर्षही त्यातून व्यक्त होईल. चिंतलपेठ ते बाली हा त्यामुळे केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही; शिक्षणातून आकाराला आलेल्या एका अभ्यासकाच्या माध्यमातून तळागाळातील ज्ञानाला जागतिक संवादाशी जोडणारी ही वाटचाल आहे…

गडचिरोली : जेमतेम सव्वाशे घरांची वस्ती… दाट जंगलाच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव… विकासाच्या मुख्य प्रवाहापासून भौगोलिकदृष्ट्या दूर असलेला परिसर… आणि कधीकाळी नक्षलवादाच्या सावटाने भयभीत झालेले वातावरण. अहेरी तालुक्यातील चिंतलपेठची ही ओळख. याच गावाच्या मातीतून शिक्षणाची पहिली अक्षरे गिरवणारे रवींद्र चुनारकर आता इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गडचिरोलीच्या वनहक्क, आदिवासी ज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाचा अनुभव मांडणार आहेत.

चुनारकर यांची इंटरटायडल लॅबच्या ‘Climate Equity Lab Cohort’साठी निवड झाली आहे. वनहक्क, आदिवासी स्वशासन, पर्यावरण संवर्धन आणि समुदायाधारित विकासाच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष तळागाळात काम करणाऱ्या चुनारकर यांना आता भारत आणि इंडोनेशियातील अनुभवांच्या देवाणघेवाणीतून हवामान न्यायाच्या व्यापक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.मात्र ही निवड केवळ एका व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय मंचावरील प्रवेशाची कहाणी नाही. ज्या गावात कधीकाळी भीतीमुळे घरांचे उंबरठे ओस पडले होते, त्याच गावातून शिक्षणाच्या बळावर उभा राहिलेला एक युवक आता ज्ञान, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर जागतिक संवादाचा भाग बनत आहे, ही या प्रवासाची खरी कहाणी आहे.

नक्षलवादाच्या सावटातून उभे राहिलेले गाव..

१९८०च्या दशकात चिंतलपेठ परिसरात नक्षलवादाचा प्रभाव होता. दुर्गम आणि जंगलव्याप्त भाग असल्याने भीतीचे वातावरण होते. नक्षलवादाच्या दहशतीमुळे काही कुटुंबांनी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. त्या काळात पोलीस यंत्रणा वगळता इतर शासकीय कर्मचारीही या भागात जाण्यास धजावत नसत, अशी परिस्थिती होती.या हिंसक वातावरणाची एक काळी आठवण गावाच्या स्मरणात आजही आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एका तरुणाची नक्षलवाद्यांनी १९९१ मध्ये निर्घृण हत्या केली. त्या घटनेने गाव आणि परिसरातील भीती आणखी गडद केली.अशा वातावरणात शिक्षण घेणे, बाहेरच्या जगाशी जोडले जाणे आणि भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हीच मोठी धडपड होती. मात्र याच कठीण वास्तवातून पुढे आलेल्या पिढीने परिस्थितीला शरण जाण्याऐवजी शिक्षणाची वाट धरली. रवींद्र चुनारकर यांचा प्रवास त्या बदलत्या चिंतलपेठचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरतो.

चिंतलपेठच्या मातीतली पहिली अक्षरे…

रवींद्र चुनारकर यांचे प्राथमिक शिक्षण चिंतलपेठ येथेच झाले. गावातील शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना गावाबाहेर पडावे लागले.चंद्रपूर जिल्ह्यातील येनबोडी येथील वसतिगृहात राहून त्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राजुरा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दुर्गम गावातून बाहेर पडून शिक्षणाची प्रत्येक पायरी चढताना परिस्थितीशी संघर्ष कायम होता; मात्र अभ्यासातील सातत्याने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्यांनी चंद्रपूर महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आणि चंद्रपूरसह चिंतलपेट गावाचे नाव चमकावले. पुढे चंद्रपूर येथील शासकीय तंत्र विज्ञान महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत विद्यापीठात अव्वल स्थान पटकावले त्यांची जिज्ञासा केवळ तांत्रिक विषयांपुरती मर्यादित राहिली नाही.

समाज कसा घडतो, आर्थिक विषमता का निर्माण होते, जंगल आणि माणसाचे नाते काय आहे आणि विकासाच्या प्रक्रियेत वंचित समुदाय कुठे उभा आहे, या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वळले.त्यातूनच सामाजिक शास्त्रे, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यांसारख्या विषयांचा त्यांनी पुढे अभ्यास केला. आणि आदिवासी समाजाला न्याय मिळत देण्याचा प्रयत्न केला कोरची, कुरखेडा ,धानोरा तालुक्यात कित्येक नागरिकांना प्रश्न निकाली काढण्यात मोलाची मदत केली असून कित्येकदा प्रशासनालाही पैसा अंतर्गत वन दावे निकालने काढण्यासाठी विशेष मदत केली आहे..

घरची परिस्थिती साधी; ध्येय मात्र मोठे…

रवींद्र यांच्या कुटुंबाची आर्थिक पार्श्वभूमीही सामान्य ग्रामीण कुटुंबासारखीच. आई घरकाम सांभाळत होती, तर वडील शेती करायचे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात उत्पन्नाची शाश्वती नव्हती. कधी उत्पादनाची अनिश्चितता, कधी बाजारभावाचा प्रश्न आणि कधी हातात आलेल्या उत्पन्नातूनच पुढील वर्षाचा संसार उभा करण्याची वेळ—या सगळ्या वास्तवाची त्यांना लहानपणापासूनच जाणीव होती.अशा परिस्थितीत शिक्षणाचा खर्च, गावाबाहेरचे वास्तव्य आणि पुढील शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. तरीही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.

गेल्या दोन वर्षांत वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर आलेल्या या आघातानंतरही त्यांनी आपला शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास कायम ठेवला. महसूल विभागात कार्यरत असलेल्या संदीप या मोठ्या भावाची साथ आणि आईचा खंबीर आधार त्यांच्या वाटचालीला बळ देत राहिला.ज्या घरात शेतीच्या उत्पन्नाची खात्री नव्हती, त्या घरातील मुलाने शिक्षणाला आपली सर्वात मोठी भांडवल मानले आणि त्याच भांडवलातून पुढे सामाजिक अभ्यासाची दिशा शोधली..

पदवीपलीकडचा शिक्षणप्रवास…

रवींद्र चुनारकर यांचा शैक्षणिक प्रवास एका पदवीवर थांबला नाही. अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर सामाजिक आणि आर्थिक शास्त्रांचा अभ्यास करताना त्यांनी शिक्षणाकडे केवळ रोजगार मिळवण्याचे साधन म्हणून पाहिले नाही.शिक्षणातून प्रश्न विचारता आले पाहिजेत, प्रश्न समजून घेता आले पाहिजेत आणि त्या प्रश्नांवर समाजाच्या पातळीवर काम करता आले पाहिजे, ही त्यांच्या वाटचालीची दिशा बनत गेली.

सामाजिक प्रश्नांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील काम यांची सांगड घालत त्यांनी ‘समता फेलोशिप’ मिळवली. देशातील सामाजिक क्षेत्रातील अभ्यास आणि कार्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही फेलोशिप त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरली.याच अभ्यासातून संशोधन, सामाजिक वास्तव आणि लोकचळवळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची दिशा त्यांच्या कामाला मिळाली.

छोट्या गावातून वनहक्काच्या व्यापक प्रश्नापर्यंत…

शिक्षण वाढत गेले तसे रवींद्र यांचे क्षेत्रही विस्तारत गेले. कुरखेडा, भामरागड, एटापल्ली, अहेरीसह गडचिरोलीच्या दुर्गम भागात प्रत्यक्ष फिरत त्यांनी वनहक्क आणि पेसाच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नांचा जवळून अभ्यास केला.ग्रामसभा अधिक सक्षम कशी होऊ शकते! सामुदायिक वनसंपत्तीवरील अधिकार प्रत्यक्षात कसे प्रभावी ठरू शकतात. जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायाची उपजीविका आणि पर्यावरण संवर्धन यांचे नाते काय आहे. विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक समुदायाचा निर्णयाधिकार किती महत्त्वाचा आहे.अशा प्रश्नांचा शोध घेत त्यांचे काम पुढे गेले.

वनहक्क कायदा, पेसा, ग्रामसभा आणि सामुदायिक वनसंपत्ती हे विषय केवळ कायद्याच्या पुस्तकांतील संकल्पना न राहता गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेले अधिकार आहेत, या भूमिकेतून त्यांनी तळागाळात काम केले.दुर्गम पाड्यांपर्यंत पोहोचत स्थानिक समुदायांच्या हक्कांविषयी जागृती, ग्रामसभांची भूमिका आणि निर्णयप्रक्रियेत स्थानिक सहभाग या मुद्द्यांना त्यांनी महत्त्व दिले.कायद्याची भाषा आणि जंगलात जगणाऱ्या माणसाचे वास्तव यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू राहिला.

अभ्यासातून धोरणाच्या चर्चेपर्यंत…

या प्रवासामुळे रवींद्र चुनारकर यांची ओळख केवळ सामाजिक कार्यकर्त्यापुरती मर्यादित राहिली नाही. अभ्यास, कायदा, प्रशासन आणि लोकसहभाग यांना जोडणारा अभ्यासक म्हणून त्यांची वाटचाल पुढे सरकत गेली. गावातील वनहक्क समितीपासून ते प्रशासनातील धोरणात्मक चर्चेपर्यंतचा हा प्रवास शिक्षणाच्या ताकदीची साक्ष देतो. ज्या प्रश्नांचा अनुभव त्यांनी बालपणी आपल्या गावात घेतला, त्याच प्रश्नांकडे पुढे अभ्यासकाच्या नजरेने पाहत त्यांनी त्यांची व्यापक सामाजिक आणि पर्यावरणीय बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला…

आता गडचिरोलीचा अनुभव जागतिक चर्चेत…

Climate Equity Labच्या माध्यमातून हवामान बदल, पर्यावरणीय बदल, सामाजिक समता, समुदायांचे अनुभव आणि न्याय्य संक्रमण यांसारख्या विषयांवर विविध पार्श्वभूमीतील नेतृत्वाला एकत्र आणले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रवींद्र चुनारकर गडचिरोलीतील अनुभव मांडणार आहेत. जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायांचे पारंपरिक ज्ञान, स्थानिक पातळीवरील पर्यावरण संवर्धनाच्या पद्धती, वनहक्काच्या चळवळीतील अनुभव आणि समुदायाच्या सहभागातून उभ्या राहणाऱ्या विकासाच्या संकल्पना यांना जागतिक हवामान न्यायाच्या चर्चेशी जोडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. नऊ महिन्यांच्या या उपक्रमातील बाली, इंडोनेशिया येथील प्रत्यक्ष सत्र हा त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

बालीत मांडला जाणार गडचिरोलीचा अनुभव..

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचताना चुनारकर यांच्यासोबत केवळ त्यांचा वैयक्तिक अनुभव जाणार नाही. त्यांच्यासोबत असेल—चिंतलपेठचे वास्तव, गडचिरोलीचे जंगल, ग्रामसभांचा अनुभव आणि वनावर अवलंबून असलेल्या समुदायांचे जगणे.पिढ्यान्‌पिढ्या निसर्गाशी सहजीवन साधत आलेल्या आदिवासी समुदायांचे पारंपरिक ज्ञान, जंगल संवर्धनाच्या स्थानिक पद्धती आणि वनहक्काच्या लढ्यातून आलेले अनुभव यांना आता व्यापक आंतरराष्ट्रीय चर्चेशी जोडण्याची संधी मिळत आहे. यामुळे ही निवड केवळ वैयक्तिक उपलब्धी म्हणून पाहण्यापेक्षा स्थानिक ज्ञान आणि तळागाळातील अनुभवाला जागतिक चर्चेच्या पटलावर मांडण्याची संधी म्हणूनही महत्त्वाची ठरणार हे मात्र विशेष…

एका गावाची वाट, एका जिल्ह्याचा अनुभव…

चिंतलपेठच्या छोट्याशा शाळेत सुरू झालेला रवींद्र चुनारकर यांचा शिक्षणप्रवास पुढे चंद्रपूर, राजुरा, अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्रे, अर्थशास्त्र, फेलोशिप आणि त्यानंतर गडचिरोलीच्या दुर्गम भागातील प्रत्यक्ष कामापर्यंत पोहोचला. आज त्याच प्रवासाची पुढची पायरी इंडोनेशियापर्यंत पोहोचली आहे.या प्रवासाचे अंतर केवळ किलोमीटरमध्ये मोजता येणार नाही. ते अंतर आहे—दुर्गम गाव आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठामधले; मर्यादित साधने आणि व्यापक ज्ञानामधले; स्थानिक अनुभव आणि जागतिक चर्चेमधले अभ्यासात धडे गीळवता येणार आहे.

चिंतलपेठच्या ज्या मातीत शिक्षणाची पहिली अक्षरे उमटली, त्याच शिक्षणाने पुढे प्रश्न विचारण्याची दृष्टी दिली; अभ्यासाने त्या प्रश्नांना दिशा दिली आणि क्षेत्रकार्याने त्यांना वास्तवाची जोड दिली.आता बालीत रवींद्र चुनारकर आपले अनुभव मांडतील, तेव्हा त्या अनुभवांमध्ये केवळ चिंतलपेठ नसेल; गडचिरोलीच्या जंगलाशी, जमिनीशी आणि निसर्गाशी पिढ्यान्‌पिढ्या नाते जपणाऱ्या समुदायांचे जगणे, ज्ञान आणि संघर्षही त्यातून व्यक्त होईल त्यामुळेच चिंतलपेठ ते बाली हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही; शिक्षणातून आकाराला आलेल्या एका अभ्यासकाच्या माध्यमातून तळागाळातील ज्ञानाला जागतिक संवादाशी जोडणारी ही वाटचाल आहे…

 

आंतरराष्ट्रीय शिक्षणभारत सरकारसमाजकार्य
Comments (0)
Add Comment