जपतलाई अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाचा थरार; ३ विद्यार्थिनींचा मृत्यू, एक अत्यवस्थ, दोघी गंभीर; १४ निरीक्षणाखाली..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली अंतर्गत ही आश्रमशाळा चालविली जाते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत साप शिरला. त्यावेळी सुमारे ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. याचदरम्यान काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना तातडीने धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान धानोरा येथे दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत एकूण तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दीपिका बिटकुसाय मडावी, इयत्ता पाचवी, हिची प्रकृती अत्यवस्थ असून, आणखी दोन विद्यार्थिनी गंभीर असल्याची माहिती डॉ. मनीष मेश्राम यांनी दिली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर, इतर १४ विद्यार्थिनींना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सर्पदंशाच्या घटनेनंतर इतर विद्यार्थिनीही घाबरल्याने त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सर्पदंशाची घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, याचा तपास सुरू आहे.

या घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वसतिगृहांची स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि सर्पप्रतिबंधक उपाययोजनांची सर्व आश्रमशाळांमध्ये तपासणी व चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, जपतलाई येथील घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, संस्थेच्या पातळीवर कुठेही दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

“जपतलाई येथे घडलेली घटना अत्यंत दुःखद आणि गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत संस्थेच्या पातळीवर कुठेही दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आल्यास, संबंधितांवर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल.”

अविशांत पंडा
जिल्हाधिकारी, गडचिरोली,

जपतलाई आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी…

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक आणि नागपूर येथील पथके आज घटनास्थळी दाखल होऊन आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी करणार आहेत.

घटनेत उपचाराधीन तीन विद्यार्थिनींना सर्पदंश प्रतिबंधक औषध (अँटी-व्हेनम) देण्यात आले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, व्यवस्थापनाकडून नियमांचे पालन झाले का, याची चौकशी करण्यात येणार आहे. निष्काळजीपणा किंवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. उपचाराधीन विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व उपचार आणि सहकार्य देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

3 students dedDhanora shenk byte
Comments (0)
Add Comment