धान कोंड्याच्या पोत्यांआड सागवान तस्करी; वन विभागाने धाड टाकून ६० लाखांची तस्करी केली उघड

पुष्पा' स्टाईलचा डाव उधळला; ट्रकसह मौल्यवान सागवान जप्त, १५ ते १६ संशयित फरार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

एटापल्ली : जंगलसंपत्तीची तस्करी करण्यासाठी चित्रपटालाही लाजवेल अशी शक्कल लढविणाऱ्या सागवान तस्करांचा डाव एटापल्ली वन विभागाने उधळून लावला आहे. धान कोंड्याच्या पोत्यांआड मौल्यवान सागवान लाकूड लपवून वाहतूक करण्याचा प्रयत्न वन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. या कारवाईत ट्रकसह सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १५ ते १६ संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सागवान तस्करीच्या रॅकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी मोहुर्ली उपवन क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड घेऊन एक ट्रक बाहेर पडणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वनरक्षक राकेश मडावी यांनी ही माहिती वरिष्ठांकडे पोहोचवताच वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता, धान कोंड्याच्या पोत्यांच्या आड काळजीपूर्वक लपविण्यात आलेले मौल्यवान सागवान लाकूड आढळून आले.

कारवाईनंतर जप्त ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे आणत असताना जंगलातील चिखलमय रस्त्यात अडकला. सलग अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर २ ऑगस्ट रोजी ट्रक बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पंचनामा करून ट्रकमधील सागवान लाकडाची मोजणी करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार जप्त वाहन आणि लाकडाची एकत्रित किंमत ५० ते ६० लाख रुपयांच्या घरात असल्याचे वन विभागाने सांगितले.

प्राथमिक तपासात तस्करांनी संशय टाळण्यासाठी सागवान लाकूड धान कोंड्याच्या पोत्यांखाली लपवून वाहतूक करण्याची योजना आखल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वन विभागाच्या सतर्कतेमुळे हा डाव पूर्णपणे उधळला गेला. घटनास्थळावरून फरार झालेल्या १५ ते १६ संशयितांचा शोध सुरू असून, या तस्करीमागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी वन विभागाने तपासाची व्याप्ती वाढविली आहे.

या कारवाईत वनरक्षक सचिन तोराम, अर्जुन वेडदा, कैलास मडावी, अमर कनाक्के, पुरुषोत्तम सोयाम, सैनू हिच्यामी, डी. एस. आलाम, इरफा आत्राम आणि आरती उईके यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. दरम्यान, जंगलसंपत्तीची अवैध तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

Pushpa taskarगडचिरोली सागवान
Comments (0)
Add Comment