मशरूमच्या शोधात जंगलात गेलेल्या मजुराचा वाघाने घेतला बळी!

वसा गावालगत विदारक घटना; धडापासून वेगळे झालेले पाय सुमारे १२ मीटर अंतरावर आढळले, परिसरात भीतीचे वातावरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : मशरूम आणण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या ४५ वर्षीय मजुरावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी वसा गावालगत उघडकीस आली. या हल्ल्यात बाळू विठ्ठल राऊत (४५, रा. वसा, ता. गडचिरोली) यांचा मृत्यू झाला. जंगलातून मशरूम आणण्यासाठी गेलेला कुटुंबातील सदस्य पुन्हा घरी परतलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा विदारक अवस्थेतील मृतदेह आढळल्याने वसा परिसर हादरून गेला आहे.

बाळू राऊत हे बुधवारी सकाळी मशरूम आणण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. जंगल परिसरात शोध घेत असताना त्यांचा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. मोबाइलचे ठिकाण शोधण्यासाठी सायबर सेलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले; मात्र मोबाइल बंद असल्याने त्याचे लोकेशन निश्चित होऊ शकले नाही.

दरम्यान, कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरूच ठेवली. जंगलाचा परिसर पिंजून काढल्यानंतर गुरुवारी सकाळी वसा गावालगतच्या जंगलात बाळू राऊत यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. धडापासून पाय वेगळ्या ठिकाणी आढळून आले असून, सुमारे १२ मीटर अंतरावर पाय पडलेला असल्याचे सांगण्यात आले. परिसरात वाघाचा वावर असल्याने राऊत यांच्यावर वाघाने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेने गावात भीतीचे सावट

जंगलालगतच्या परिसरात वाघाचा वावर असल्याने या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.

पोलीस, वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन झणक यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वसा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

वसा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला असून, वनविभागाकडून या परिसरातील वाघाच्या हालचालींबाबत काय उपाययोजना केल्या जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Hunting tigerTiger kill a formerWada tiger kill man
Comments (0)
Add Comment