NH48 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तरुणीचा बळी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मनोर, दि. ३१ ऑगस्ट : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वराई फाटा येथे झालेल्या अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कु. प्रिया रवींद्र पवार (२५) असे मृत तरुणीचे नाव असून ती हालोली गावातील रहिवासी होती. एका भरधाव टेंपोने प्रियाच्या ॲक्टिवा गाडीला दिलेल्या जोरदार धडकेत प्रियाच्या जागीच मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रियाच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आणि कंत्राटदारांच्या ढिसाळ कारभारामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. अशातच काही बेदरकारपणे वाहन चालकांमुळे देखील अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे. या अपघातांमध्ये बहुसंख्य स्थानिक नागरिक बळी पडत आहेत.

प्रिया पवार ही मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हालोली येथून आपल्या मैत्रिणीला सोडण्यासाठी ढेकाळे येथे ॲक्टिवा गाडीने गेली होती. मैत्रिणीला ढेकाळे येथे सोडून ती पुन्हा घरी परतत असताना वराई फाटा येथील उड्डाणपुलावर तिच्या स्कुटीला भरधाव टेंपोने धडक दिली. या धडकेत प्रिया गंभीर जखमी झाली.

अपघाताची माहिती मिळताच वराई येथील नागरिक, तसेच वराई पोलीस चौकी मधील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेतील प्रियाला मनोर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणी मनोर पोलिसांनी एका टेंपोसह चालकाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

हे देखील वाचा : 

जेष्ठ वकील उज्ज्वल निकम फडणवीसांच्या भेटीला; चर्चेला आले उधाण

इतकं महागात पडेल कल्पना नव्हती…

शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? गडचिरोलीकरांचा संतप्त सवाल..

lead newsManor accidentMumbai-Ahmadabad HighwayNH48