ड्रोनच्या आकाशात आदिवासी युवकांना रोजगाराची नवी भरारी

अमृत ड्रोन मिशन’मधून अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना पायलट प्रशिक्षणाची संधी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : शेतीपासून सर्वेक्षणापर्यंत विविध क्षेत्रांत वेगाने विस्तारत असलेल्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आता आदिवासी युवक-युवतींसाठीही रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे अनुसूचित जमातीच्या पात्र युवक-युवतींना ‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाशी आदिवासी युवकांना जोडत त्यांच्यात रोजगारक्षम कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. ड्रोनचा वापर आता केवळ छायाचित्रणापुरता मर्यादित राहिलेला नसून कृषी, जमीन सर्वेक्षण, नकाशांकन, पायाभूत सुविधा, उद्योग आणि विविध तांत्रिक सेवांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटसाठी रोजगारासोबतच स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.

प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कौशल्यावर भर…

‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत प्रशिक्षणार्थींना ड्रोन तंत्रज्ञानाचे सैद्धांतिक ज्ञान देतानाच प्रत्यक्ष उड्डाण, तांत्रिक हाताळणी आणि विविध क्षेत्रांतील वापराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृषी क्षेत्रात फवारणी व पीक निरीक्षण, जमीन सर्वेक्षण, नकाशांकन यांसह विविध तांत्रिक कामांसाठी आवश्यक कौशल्ये प्रशिक्षणातून विकसित केली जाणार आहेत.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना संबंधित क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच स्वतःची ड्रोन सेवा सुरू करण्याचाही मार्ग खुला होऊ शकतो. त्यामुळे कौशल्यविकासासोबतच आदिवासी युवकांच्या उद्योजकतेला आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मर्यादित जागा; पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत…

अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक व पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने निलेश सागर यांनी केले आहे.

प्रशिक्षणाची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी www.amrutdronemission.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे अमृतच्या गडचिरोली जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

Comments (0)
Add Comment