हत्तींचा धुडगूस; शेतकऱ्यांची चिंता वाढली

धानशेतीत कळपाचा शिरकाव; वाघांच्या दहशतीनेही शेतकरी भयभीत — केवळ जनजागृती नव्हे, प्रतिबंधात्मक उपायांची मागणी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : धान काढणीचा हंगाम सुरू असतानाच जंगली हत्तींच्या कळपाने चुरचुरा चक परिसरात ठाण मांडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील आठवडाभरापासून हत्तींचा कळप परिसरातील शेतांमध्ये शिरून धानपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांसमोर हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

चुरचुरा, महादवाडी, कुऱ्हाडी, नवरगाव, पिपरटोला, धुंडेशिवणी, कळमटोला आणि दिभना परिसरात हत्तींचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी हत्तींचा कळप शेतात दाखल होत असल्याने पिकांचे नुकसान तर होतच आहे; मात्र शेतात जाणेही धोकादायक बनले आहे. वर्षभर मेहनत करून उभे केलेले धानपीक काढणीच्या उंबरठ्यावर असताना हत्तींच्या कळपामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हत्तींच्या मार्गावर शेती; संरक्षणाची जबाबदारी कोणाची?..

गडचिरोली जिल्ह्यात ओडिशा मार्गाने जंगली हत्तींचा वावर वाढल्यानंतर मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या सातत्याने गंभीर होत आहे. हत्तींच्या कळपामुळे शेतीचे नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत असताना शेतकऱ्यांना केवळ सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करून प्रश्न सुटणार नाही, अशी भावना आता व्यक्त होत आहे.

वनविभागाकडून जनजागृती, सूचना आणि वन्यजीवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात असले तरी प्रत्यक्ष शेतजमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हत्तींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणे, संवेदनशील गावांमध्ये रात्रीची गस्त वाढविणे आणि शेतकऱ्यांना वेळीच सतर्क करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

हत्तींसोबत वाघांचीही दहशत..

एका बाजूला हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांच्या पिकांना लक्ष्य केले असताना दुसरीकडे जंगलालगतच्या शेतांमध्ये वाघांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती कायम आहे. जंगलालगतच्या शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व मजुरांना वाघाच्या हल्ल्याची धास्ती आहे. त्यामुळे हत्तींपासून पिकांचे आणि वाघांपासून जीविताचे संरक्षण, अशी दुहेरी कसरत ग्रामीण भागातील नागरिकांना करावी लागत आहे.

जनजागृतीसोबत ठोस प्रतिबंध हवा..

वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवाची सुरक्षितता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असल्या तरी शेतकऱ्यांचे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे वनविभागाने केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता हत्ती व वाघांच्या हालचालींचे नियमित निरीक्षण, संवेदनशील भागात प्रभावी गस्त, पूर्वसूचना यंत्रणा आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

हत्तींचा धुडगूस आणि वाघांची दहशत या दोन्ही संकटांमध्ये ग्रामस्थांना स्वतःच्या जीवाची तसेच पिकांची सुरक्षा स्वतःच करावी लागत असेल, तर वन्यजीव-मानव संघर्ष रोखण्यासाठीच्या यंत्रणेचा नेमका उपयोग काय? असा सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.

Comments (0)
Add Comment