सूरजागडात रंगला खाणवीरांच्या सुरक्षेचा महासंग्राम

४४ वा मेटलिफेरस सेफ्टी वीक : आपत्कालीन संकटांशी भिडण्याचे प्रात्यक्षिक; नागपूर विभागातील ६१ खाणी, २४० स्पर्धकांचा कस..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : खोल भूगर्भातील खाणकामात काम करताना झालेली सेकंदाची चूकही जीवावर बेतू शकते. याच धोक्याची जाणीव ठेवून सुरक्षिततेला सवयीत नव्हे, तर रक्तात भिनवण्याच्या उद्देशाने लॉयड्स मेटल्सच्या सूरजागड लोहखनिज खाणीत ‘ट्रेड टेस्ट’ व ‘प्रथमोपचार’ स्पर्धांचा थरार रंगला. ४४ व्या मेटलिफेरस माइन्स सेफ्टी वीक अंतर्गत आयोजित या महासंग्रामात नागपूर विभागातील तब्बल ६१ खाणींमधून आलेल्या २४० स्पर्धकांनी आपले तांत्रिक कौशल्य आणि संकटसमयी तत्काळ धावून जाण्याची क्षमता पणाला लावली.

पश्चिम विभाग (नागपूर) यांच्या वतीने आयोजित या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी लॉयड्स मेटल्सचे हेड्री झोन संचालक एन. जयप्रकाश यांनी सुरक्षा मोहिमेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली, तर समितीचे सचिव जीवन हेडाऊ यांनी स्पर्धेचे गांभीर्य व उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रत्यक्ष खाणीत घडणाऱ्या संभाव्य दुर्घटना आणि अशा क्षणी जखमी कामगाराला दिला जाणारा ‘गोल्डन अवर’मधील प्रथमोपचार, यावर आधारित प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या संपूर्ण स्पर्धेदरम्यान खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या (DGMS) वरिष्ठ अधिकाऱ्यांची करडी नजर राहिली. रिजन-I चे डेप्युटी डायरेक्टर आर. सुधीर तसेच रिजन-II चे के. श्रीनिवास व महेंद्रनाथ यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून सुरक्षा नियमांची काटेकोर तपासणी केली. विविध खाणींतून आलेल्या कामगारांनी आधुनिक तंत्रज्ञान, आपत्कालीन बचावकार्य आणि तत्पर प्रतिसादाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

समारोपीय सत्रात समितीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक टी. ए. भास्कर यांनी स्पर्धकांच्या अतुलनीय कौशल्याचे कौतुक करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिके देऊन गौरविले. सूरजागड खाणीचे मोहसिन खान यांनी आभार मानले. सुरक्षिततेचा हा संदेश केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष खाणीच्या पोटात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचे कवच बनावा, या संकल्पासह कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments (0)
Add Comment