लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वांगेतुरी(गडचिरोली) : जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत आणि उपचारासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते, अशा छत्तीसगड सीमेलगत वसलेल्या अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम वांगेतुरी परिसरातील आदिवासी बांधवांसाठी गडचिरोली पोलीस दलाने थेट दारी आरोग्यसेवा पोहोचवत नवा आदर्श घालून दिला. नक्षलग्रस्त भागात केवळ कायदा आणि सुव्यवस्था न राखता जनसामान्यांच्या आरोग्याची ढाल बनत पोलिसांनी आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिरात तब्बल १७० ग्रामस्थांची कसून तपासणी करण्यात आली, तर गंभीर स्वरूपाचे आजार आढळलेल्या २० रुग्णांना पुढील उपचारासाठी तातडीने मोठ्या रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि नागपूरच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम प्रत्यक्ष सीमेवर राबविण्यात आला. शासकीय योजना आणि आधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहिलेल्या टोकाच्या खेड्यापाड्यांतील दुर्बल घटकांना त्यांच्या गावातच मोफत व दर्जेदार आरोग्य उपचार मिळावेत, हा यामागील मुख्य उद्देश होता.
या शिबिरात जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप जोशी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सारंग डोंगरे आणि प्रांजल नागोसे यांच्यासह परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिवसभर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. हंगामी आजार, कुपोषण आणि आरोग्याची दैनंदिन काळजी यावर सविस्तर समुपदेशन करत गरजू रुग्णांना आवश्यक ती सर्व औषधे मोफत उपलब्ध करून दिली. आरोग्य तपासणीसोबतच नक्षलविरोधी लढ्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचे स्मरण, सी-६० कमांडोंचे शौर्य आणि पोलिसांच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देणारे माहितीपूर्ण प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले होते.
गडचिरोली पोलीस दलाचा ‘पोलीस दादालोरा खिडकी’ आणि नागरी कृती उपक्रम दुर्गम भागात जीवनवाहिनी ठरत आहे. सन २०२१ पासून आजतागायत जिल्ह्यात अशा तब्बल २२६ आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय सहा रक्तदान शिबिरांतून ४ हजार ८६४ रक्तपिशव्या गोळा करण्यात आल्या असून, ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९ हजार ९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून १ हजार ४१२ जणांच्या डोळ्यांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., सहायक पोलीस अधीक्षक तथा हेडरीचे एसडीपीओ सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. प्रत्यक्ष नियोजनासाठी वांगेतुरीचे पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लरवार, CRPF १९१ बटालियनचे सहायक कमांडंट मनोज कुमार, पोलीस निरीक्षक जितेंद्र कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी व जवानांनी परिश्रम घेतले. संवेदनशील सीमाभागात खाकी वर्दीने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे पंचक्रोशीतील नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे.