दुष्काळातून वाचलेले पीक आता अवकाळीच्या विळख्यात

धान कापणीच्या ऐन हंगामात ढगाळ वातावरण अन् रिमझिम पावसाच्या सरी; आधीच खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाची धास्ती वाढली...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रवि मंडावार 

गडचिरोली : आधी पावसाने दगा दिला, नंतर दुष्काळाने हातातोंडाशी आलेले पीक संकटात टाकले आणि आता कापणीच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाचे सावट! निसर्गाच्या या बदलत्या लहरींशी झुंज देणाऱ्या बळीराजाची परीक्षा संपण्याचे नाव घेत नाही. चामोर्शी तालुक्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी, बांधणी आणि मळणीची कामे युद्धपातळीवर सुरू असतानाच बंगालच्या उपसागरातील ‘अकवान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात बदल झाला आहे. गेल्या तिन दिवसांपासून आकाश ढगाळ असून शुक्रवारी काही भागांत रिमझिम पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे शेतात कापून ठेवलेले धान भिजण्याची, तर उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या संकटातून कसे बसे वाचविलेले पीक आता अवकाळीच्या तडाख्यात सापडण्याने बळीराजा अक्षरशः धास्तावला आहे.

आधी दुष्काळाचे संकट; आता कापणीवर पावसाचे सावट…

यावर्षी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धान पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि चामोर्शी या दोन तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कष्टाने आणि पदरमोड करून उभे केलेले पीक आता कापणीच्या टप्प्यावर आले आहे. मात्र, याच निर्णायक काळात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.

धान उत्पादक तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत हलक्या, मध्यम आणि जड धानाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या अनेक गावांमध्ये धान कापणी आणि बांधणीची लगबग सुरू आहे. काही शेतकरी हार्वेस्टरच्या साहाय्याने कापणी व मळणीची कामे आटोपत आहेत, तर काहींनी थ्रेशरद्वारे मळणी करण्यासाठी कापलेले धान शेतात पुंजून ठेवले आहे. अनेकांच्या शेतात कापणी पूर्ण झाली असली तरी बांधणी आणि मळणीची कामे अद्याप बाकी आहेत. अशात पावसाने हजेरी लावल्याने कापलेले धान भिजण्याबरोबरच त्याच्या दर्जावर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती बळीराजा बळीराजांनी व्यक्त केली आहे.

मजूर टंचाईचा फटका; ४० किलोमीटरवरून आणावे लागताहेत मजूर…

निसर्गाच्या संकटाबरोबरच मजूरटंचाईनेही शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. कापणी आणि बांधणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना तब्बल ४० किलोमीटर अंतरावरून मजूर स्वतःच्या किंवा भाड्याच्या वाहनातून रोज नेआण करून शेतीची कामे उरकावी लागत आहेत. त्यात मजुरीचा वाढलेला खर्च आणि पावसापूर्वी कामे पूर्ण करण्याची घाई यामुळे आर्थिक भार अधिकच वाढला आहे.

दुष्काळामुळे आधीच उत्पादन खर्च वाढला. आता कापणी-मळणीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीत, दुसरीकडे अवकाळी पावसाने अस्मानी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर वेळ आणि खर्च या दोन्हींचे आव्हान उभे ठाकले आहे.

वर्षभराचा घाम मातीमोल होण्याची भीती..

शेतीत केलेली गुंतवणूक, बी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीचा खर्च यांचा हिशेब आधीच जुळत नसताना हातातोंडाशी आलेले पीकही संकटात सापडले आहे. दुष्काळातून वाचविलेल्या धानावर आता पावसाचे सावट आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षभर शेतात राबूनही निसर्गाच्या लहरीपुढे हतबल होण्याची वेळ पुन्हा एकदा बळीराजावर आली आहे.

‘आधी पावसाने साथ दिली नाही, आता कापणीच्या वेळीही निसर्ग परीक्षा पाहत आहे. दुष्काळाचा सामना करत पीक वाचविले; मात्र त्यासाठी मोठा खर्च झाला. आता अवकाळी पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला तर आमच्या कष्टांचे काय? आमचे अश्रू पुसणार कोण?’ अशी व्यथा जिल्हाभरात बळीराजांकडून व्यक्त केली जात आहे.

तर, ‘दरवर्षी कधी अतिवृष्टी, कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ अशा संकटांचा सामना करावा लागतो. यंदाही पावसाने साथ दिली नाही. शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना त्या तुलनेत हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत बळीराजाने आर्थिक संकटातून बाहेर पडायचे तरी कसे?’ असा प्रति प्रश्न निर्माण झालेला आहे..

शेतकऱ्यांच्या नशिबी संकटांचे चक्र कायम..

शेती हा केवळ उत्पादनाचा व्यवसाय नसून लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च, मजूरटंचाई आणि अपेक्षित आर्थिक परतावा न मिळणे या समस्यांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण आधीच डळमळीत झाले आहे. त्यात कापणीच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यातही शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही.

दुष्काळाने पिकाची वाढ खुंटवली, वाढत्या खर्चाने खिशाला कात्री लावली आणि आता अवकाळीने कापणीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आशेलाच धोका निर्माण केला आहे. वर्षभर घाम गाळून पिकविलेल्या धानाच्या प्रत्येक दाण्यासाठी झुंजणाऱ्या बळीराजाला यंदा तरी निसर्ग साथ देणार का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच दिसत आहे.

Comments (0)
Add Comment