लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अवकाळी पावसाच्या सरींनंतर वातावरणात थंडी वाढू लागल्याने गडचिरोलीकरांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. सकाळच्या धुक्यासह रात्रीच्या वाढत्या थंडीमुळे स्वेटर, जॅकेट, हुडी, शाल, मफलर आणि कानटोप्यांची मागणी वाढली आहे. शहरातील बाजारपेठेत उबदार कपड्यांचे विविध प्रकार उपलब्ध झाले असून, खरेदीसाठी नागरिकांची वर्दळही वाढू लागली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिकही थंडीची तयारी करण्यासाठी शहराकडे वळत आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा उबदार कपड्यांच्या किमतीत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
एरवी दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढू लागतो. यंदा मात्र पावसाळ्याचा मुक्काम लांबल्याने थंडीचे आगमनही उशिरा झाले. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून गारव्याची चाहूल लागली असतानाच, अवकाळी पावसामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला. मागील काही दिवसांपासून सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने उबदार कपड्यांची गरज वाढली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही स्वेटर, जॅकेट आणि इतर हिवाळी कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत.
बाजारपेठेत ३०० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारचे उबदार कपडे उपलब्ध आहेत. महिला आणि पुरुषांसाठी जॅकेटची सुरुवात साधारणतः ५०० रुपयांपासून होते. कानटोप्या ५० ते ३०० रुपये, तर हातमोजे ५० रुपयांपासून मिळत आहेत. तरुणाईमध्ये फॅशनेबल स्वेटशर्ट, विंटर कोट, कॉटन जॅकेट आणि हुडीला विशेष पसंती मिळत आहे. विद्यार्थी आणि तरुण ब्रँडेड कपड्यांकडे आकर्षित होत असताना, लहान मुलांसाठी मऊ, आरामदायी आणि आकर्षक चित्रे असलेल्या स्वेटरना मागणी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर, मफलर, कानटोपी आणि कानपट्टी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
थंडीच्या दिवसांतही फॅशनचा बाज जपण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे. पेहरावाला साजेसे रंग आणि आकर्षक डिझाइन असलेल्या लोकरीच्या स्वेटर, शाली, स्कार्फ, मफलर, हातमोजे, मोजे, कानटोप्या आणि कानपट्ट्यांचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. गरज आणि आवड यांचा मेळ साधत महिला उबदार कपड्यांची खरेदी करत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विविध प्रकारचे कपडे उपलब्ध असल्याने ग्राहकांना निवडीचे अनेक पर्याय मिळत आहेत.
यंदा उबदार कपड्यांच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी आवश्यक कपडे खरेदी करताना ग्राहकांना खर्चाचे गणित जुळवावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकही शहरात येऊन आपल्या गरजेनुसार कपड्यांची निवड करत आहेत. थंडीचा जोर जसजसा वाढत आहे, तसतशी उबदार कपड्यांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या गारठ्यामुळे बाजारपेठेत हिवाळी खरेदीची लगबग सुरू झाली असून, नागरिकांकडून स्वेटर, जॅकेट आणि इतर उबदार कपड्यांना पसंती दिली जात आहे.