संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठेचा संकल्प; जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांचे पालन करण्याचा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा निर्धार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संविधानातील मूल्ये आणि तत्त्वांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय, समानता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार संतोष आष्टीकर, नायब तहसीलदार वनिशाम येरमे, नायब तहसीलदार संगीता धकाते यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधानाने देशाच्या लोकशाही व्यवस्थेला दिलेली दिशा आणि उद्देशिकेत अधोरेखित करण्यात आलेली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रशासनासाठीही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर नायब तहसीलदार वनिशाम येरमे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे उद्देशिकेचे वाचन करत संविधानिक मूल्यांप्रती निष्ठेचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार वनिशाम येरमे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीसंविधान दिन
Comments (0)
Add Comment