‘एका क्लिकची चूक महागात पडू शकते’; डिजिटल व्यवहारात सतर्क राहा

लोकसंवाद-२०२६ अंतर्गत आष्टीत सायबर सुरक्षा जनजागृती; १९३० हेल्पलाइनवर तातडीने संपर्काचे आवाहन...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबत सायबर फसवणुकीचे प्रकारही बदलत आहेत. त्यामुळे अनोळखी लिंक, संदेश, फोन किंवा आर्थिक आमिषांना बळी न पडता डिजिटल व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगा, असे आवाहन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे माहिती व तंत्रज्ञान संचालक तथा इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली आणि महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ‘सायबर सुरक्षा – सुरक्षित रहा, जागरूक रहा’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम झाला. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून बचावाच्या उपायांची माहिती देण्यात आली.

ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा अन्य गोपनीय तपशील कोणालाही देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, अपरिचित व्यक्तीच्या सांगण्यावरून ॲप डाउनलोड करणे किंवा ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे टाळावे. लॉटरी, नोकरी, बक्षीस अथवा आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाऱ्या संदेशांची खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

सोशल मीडियावर मोबाईल क्रमांक, लोकेशन, प्रवासाची माहिती आणि खासगी छायाचित्रे जाहीर करतानाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. वेगवेगळे आणि मजबूत पासवर्ड, टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर तसेच अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट व संदेशांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला.

सायबर बुलिंग, बनावट सोशल मीडिया प्रोफाईल, आवाजाची नक्कल, बनावटी चेहरा आणि ओळख चोरीसारख्या गुन्ह्यांपासूनही नागरिकांनी सावध राहावे. आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मुसाने, प्राध्यापक, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सोशल मीडियावर थेट प्रसारण करण्यात आल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंतही सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचला.

Cyber lectureCyber security
Comments (0)
Add Comment