लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
जिमलगट्टा (गडचिरोली) : दुर्गम भागातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी दूरवरच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, या दृष्टीने जिमलगट्टा येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. गुरुवारपासून या कार्यालयाचे कामकाज प्रत्यक्ष सुरू झाले असून, अपर तहसीलदार म्हणून प्रतीक आढाव यांनी पदभार स्वीकारला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना महसूल प्रशासनाच्या सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिमलगट्टा येथील नागरिकांच्या वतीने प्रतीक आढाव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय गरजा लक्षात घेता या कार्यालयाची सुरुवात महत्त्वपूर्ण मानली जात आहे. महसूलविषयक कामांसाठी होणारी धावपळ आणि वेळेचा अपव्यय कमी होण्यास या व्यवस्थेचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर महसूल प्रशासनाची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आपल्या भागातील महसूलविषयक कामांसाठी अधिक सुलभतेने संपर्क साधता येणार असल्याने प्रशासकीय कामकाजालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
यावेळी अव्वल कारकून शेखर मेश्राम, मंडळ अधिकारी एन. एन. मेश्राम, महसूल सहायक व्ही. डी. पुगाटी, तलाठी राजेश आत्राम, देविदास लेखामी, स्वप्नील बोदलकर, शशांक करगामी, रवींद्र धिमे, अश्विनी सडमेक, मीनाक्षी सिडाम यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
तसेच महसूल सेवक राहुल गोडबोले, मारोती दुर्गे, अशोक दिकोंडा, श्रीनिवास पानेम, रपेंद्र तलांडी, निलेश सोयाम, सत्यनारायण कुमरे, भगवंत बलबद्रा, राजेश मडावी, बानया येरमा, महादेव दागाम, सीताराम कुडमेथ, सुजाता पोरेतेट, संध्या बेलादी यांच्यासह डॉ. शशिकांत उपगनलावर, नारायण गज्जमवार, तिरुपती कीर्तिवार, संजय गज्जलवार, श्रीनिवास गुडमेलवार, नंदेश्वर मेश्राम, सागर पडमट्टीवार, राजाराम बोधनवार, तिरुपती अल्लूर, ओंकार चिप्पावार आणि नागेश कोरेत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.