दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत पावसाचा जोर; सिरोंच्यात पुराचा वेढा, भामरागडमध्ये एसडीआरएफने तिघांना दिले जीवदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सिरोंचा, अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांमध्ये नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सिरोंचा तालुक्यात तब्बल १५ गावांना पुराचा वेढा पडला असून अनेक रपट्यांवरून पाणी वाहिल्याने काही काळ वाहतूक आणि गावांचा संपर्क विस्कळीत झाला.

गेल्या २४ तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १११.२ मिलिमीटर, तर पेंटिपाका मंडळात १७६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येडसिली गावात पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कोठा–पोचमपल्ली मार्गावरील रपटा पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

दरम्यान, भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे पामुलगौतम नदीला अचानक आलेल्या पुरात शेतातून परतणारे एकाच कुटुंबातील तिघे जण अडकले होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार एसडीआरएफ, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचाव मोहीम राबवत मुसळधार पाऊस, अंधार आणि वेगवान प्रवाहाचा सामना करत तिन्ही जणांना सुखरूप बाहेर काढले.

अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन आज गडचिरोली, मुळचेरा आणि सिरोंचा तालुक्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रिमझिम पाऊस कायम असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नागरिकांनी नदी-नाले, पूल, रपटे आणि वाहत्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

Gadchiroli hevy rainGadchiroli rain red alertRoad block
Comments (0)
Add Comment