जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे निलंबित

कर्तव्यात कसूर व पर्यवेक्षकीय दुर्लक्षाचा ठपका; शासनाकडून विभागीय चौकशीचे आदेश...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर, पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा व दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत शासनाने ही कारवाई केली असून, त्यांच्या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ अंतर्गत डॉ. लहाडे यांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत हे निलंबन कायम राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

विभागीय चौकशीचेही आदेश

शासनाच्या आदेशात डॉ. लहाडे यांच्या पर्यवेक्षकीय जबाबदारीतील कर्तव्यपालनाबाबत गंभीर निष्काळजीपणा व दुर्लक्ष झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधातील प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत नेमकी जबाबदारी आणि वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

गोंदिया जिल्हा रुग्णालय राहणार निलंबन काळातील मुख्यालय

निलंबनाच्या कालावधीत डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे. सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबनाच्या कालावधीत शासनाच्या नियमानुसार त्यांना निर्वाहभत्ता तसेच लागू असलेले पूरक भत्ते देण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने हा शासन आदेश जारी करण्यात आला असून, कार्यासन अधिकारी अनिल महादेव कुमेरिये यांनी डिजिटल स्वाक्षरीने आदेश निर्गमित केला आहे.

Gadchiroli medical issuesVarsha lahadeवर्षा लहाडे निलंबन
Comments (0)
Add Comment