लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | प्रतिनिधी
माओवादी कारवायांना मोठा आळा बसून गडचिरोली शांततेच्या नव्या पर्वात प्रवेश करत असतानाच, घनदाट जंगलाच्या कुशीत वर्षानुवर्षे दडवून ठेवलेला माओवाद्यांचा ‘मृत्यूचा साठा’ पोलिसांच्या हाती लागला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी गडचिरोली पोलिसांनी गॅरापत्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगलात धडक कारवाई करत जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य आणि माओवादी साहित्याचा मोठा साठा हस्तगत केला. ११ कुकर, चार डेटोनेटर, तीन किलो गनपावडर, कॉर्टेक्स वायर, बॅटरी, स्टील कंटेनर, वायर बंडल आणि सोलर प्लेटसह साहित्य जप्त करण्यात आले.
पूर्वी सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी माओवादी संघटनेकडून दुर्गम जंगलांचा आधार घेत स्फोटक साहित्य तयार करून ते जमिनीखाली लपवून ठेवले जात होते. नक्षल सप्ताह, निवडणुका किंवा सुरक्षा दलांच्या हालचालींच्या काळात या साठ्याचा वापर करण्याचा कट असायचा. मात्र, माओवादी प्रभाव संपुष्टात आणण्याच्या अभियानानंतर आता जंगलाच्या गर्भात दडलेले जुने स्फोटकसाठे शोधून काढून संभाव्य धोका कायमचा दूर करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे ४ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली, प्राणहिता येथील चार तुकड्या आणि बीडीडीएसच्या दोन पथकांना टव्वे जंगल परिसरात रवाना करण्यात आले. घनदाट जंगलात जवानांनी कसून शोधमोहीम राबविली. बीडीडीएस पथकाने संशयास्पद ठिकाणांची बारकाईने तपासणी केली असता जमिनीत लपवून ठेवलेला माओवादी साहित्याचा साठा आढळून आला.
कारवाईत स्फोटकासाठी वापराचे ११ कुकर, कॉर्टेक्स वायरचे तीन बंडल, सुमारे १०० फुट वायर, तीन किलो गनपावडर, चार डेटोनेटर, १२ व्होल्टची एक बॅटरी, २५० ग्रॅम फटाका बारुद, चार स्टील कंटेनर, आठ वायर बंडल आणि एक सोलर प्लेट यासह अन्य माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
बंदुका शांत झाल्या; आता जंगलातील लपलेले धोके शोधण्याची मोहीम…
गडचिरोलीतील माओवादी कारवायांना मोठा धक्का बसल्यानंतर सुरक्षा यंत्रणांसमोरचे आव्हान केवळ सशस्त्र माओवादी शोधण्यापुरते राहिलेले नाही. जंगलात पूर्वी लपवून ठेवलेली शस्त्रे, स्फोटके आणि घातपाती साहित्य शोधून निष्प्रभ करणे, हीदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
टव्वे जंगलातील ही कारवाई त्याच दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. कारण माओवादी प्रभाव कमी झाला असला तरी, पूर्वी तयार करून जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य अचानक सुरक्षा दलांसाठी किंवा जंगलात जाणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रत्येक साठ्याचा शोध घेऊन तो निष्प्रभ करण्याचे काम पोलिस दलाकडून सातत्याने सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बि. जे. आणि पोलिस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
विशेष अभियान पथक गडचिरोली, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली. पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले.