३० वर्षांपासून रस्ता खड्ड्यांत; चौघांचा सर्पदंशाने मृत्यू!

खांदला–चिरेपल्ली–आलापल्ली मार्गाच्या दुरवस्थेने पाच गावांचा संपर्क धोक्यात; सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा २१ ऑक्टोबरपासून अहेरीत ठिय्या आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी | प्रतिनिधी

रस्त्याची दुरवस्था, आरोग्यसेवेचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाच गावांतील नागरिकांचे जीवनच धोक्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील खांदला ते चिरेपल्ली आणि चिरेपल्ली ते आलापल्ली या मार्गाची गेल्या ३० वर्षांपासून दुरवस्था झाली असून, रस्त्याअभावी मागील तीन वर्षांत चिरेपल्ली आणि मरणेली येथील चार जणांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर दावा ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याअभावी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नसल्याने आरोग्यसेवेचा प्रश्न जीवघेणा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित २२ किलोमीटर रस्त्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी देऊन डांबरीकरण करावे, अशी मागणी चिरेपल्ली ग्रामसभेने आणि जय पेरसापेन गोठुल समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खांदला–चिरेपल्ली–आलापल्ली हा मार्ग परिसरातील पाच गावांना तालुका मुख्यालयाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, रस्त्याची दयनीय अवस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे या गावांतील नागरिकांचा संपर्क तुटण्याची वेळ येते. परिणामी, अत्यावश्यक वैद्यकीय उपचार मिळविणे कठीण होते. शालेय विद्यार्थ्यांनाही खराब रस्त्यामुळे शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना आजही संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने निवेदने दिली आहेत. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तहसीलदार, अहेरी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते. याशिवाय उपविभागीय अधिकारी, अहेरी, अपर जिल्हाधिकारी, अहेरी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता, गडचिरोली तसेच जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनाही रस्त्याच्या समस्येबाबत वेळोवेळी अवगत करण्यात आले. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाच्या दिशेने ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

चार मृत्यूंच्या दाव्यानंतरही रस्त्याचा प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. एखाद्या रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रस्ता उपलब्ध नसणे, पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटणे आणि विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासात अडचणी सहन कराव्या लागणे, ही केवळ गैरसोयीची नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात या प्रश्नावर सात दिवसांच्या आत ठोस निर्णय घेऊन रस्त्याच्या मंजुरीची व डांबरीकरणाची कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अहेरी येथे पाच गावांतील ग्रामस्थांच्या वतीने मागण्या पूर्ण होईपर्यंत लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

आता प्रशासन या गंभीर मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला मंजुरी देते की ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, याकडे खांदला, चिरेपल्ली आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती होण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Comments (0)
Add Comment