उपक्रमशीलतेतून शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास; कढोली (खुर्द) शाळेची MASS-2 अंतर्गत पाहणी

शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड यांनी घेतला शाळेच्या पायाभूत सुविधांचा आढावा; विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केले मार्गदर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरपना : तालुक्यातील कढोली (खुर्द) येथे केवळ वर्गखोल्या आणि भौतिक सुविधांपुरती शाळेची ओळख मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती कोरपना येथील माजी गटशिक्षणाधिकारी तथा गडचांदूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड यांनी गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कढोली (खुर्द) येथे भेट देऊन शाळेतील पायाभूत सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.

राज्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मिशन अंगणवाडी-शाळा सक्षमीकरण’ (MASS-2) उपक्रमांतर्गत ही पाहणी करण्यात आली. यावेळी शाळेतील उपलब्ध अतिरिक्त भौतिक सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. शाळा मूल्यांकन प्रपत्राच्या आधारे वर्गखोल्या, विविध भौतिक सुविधा आणि शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पाहणी करून शिक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. उपलब्ध सुविधांचे मूल्यमापन करतानाच शाळेच्या गरजा आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची नोंद घेण्यात आली.

उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर…

शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही कल्याण जोगदंड यांनी जाणून घेतली. शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. यामध्ये आदर्श परिपाठ, निपुण महाराष्ट्र अभियान, आनंददायी दप्तरमुक्त शनिवार, वाचनालय, नियमित पालक संपर्क, पालक सभा, माता पालक गट, परसबाग, विज्ञान प्रयोगशाळा, विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठी सराव वर्ग, नवरत्न स्पर्धा आणि बालक्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी अशा उपक्रमांचा समावेश आहे.

अभ्यासाची गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेणे आणि पालकांचा शाळेतील सहभाग वाढविणे, या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शालेय शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे असावे, या दृष्टीने शाळेतील उपक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद; शिक्षकांना मार्गदर्शन…

भेटीदरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी जोगदंड यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर प्रत्यक्ष संवाद साधला. विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, शैक्षणिक जिज्ञासा आणि विषयांबाबतची समज जाणून घेण्याचा प्रयत्न करत त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही शिक्षकांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी अधोरेखित केले.

शाळेच्या विकासासाठी उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची नियोजनबद्ध अंमलबजावणी यांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक कार्यात सातत्य राखावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

शाळेचा सुंदर, स्वच्छ व सुशोभित परिसर पाहून जोगदंड यांनी समाधान व्यक्त केले. शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीमुळे शाळेतील पायाभूत सुविधांच्या मूल्यमापनासोबतच शैक्षणिक उपक्रमांची माहिती सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.