नवशक्ती दुर्गामाता उत्सवाला भक्तिभावाचा मंगल प्रारंभ!

माजी खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते विधिवत पूजन व महाआरती; रेड्डी गोडाऊन चौकात नवरात्रोत्सवाचा उत्साह..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : शक्तीची आराधना, श्रद्धेचा जागर आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण अशा मंगलमय सोहळ्यात गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौक येथील नवशक्ती दुर्गामाता उत्सव मंडळाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिभावपूर्ण वातावरणात आरती संपन्न झाली. दुर्गामातेच्या जयघोषाने आणि उपस्थित भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दुर्गामातेच्या चरणी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना..

दुर्गामातेचे पूजन केल्यानंतर डॉ. अशोकजी नेते यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली. प्रत्येकाच्या जीवनात समाधान नांदो, सर्वांना उत्तम आरोग्य लाभो आणि नागरिकांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून शक्ती, श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा पवित्र सण आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील परस्पर स्नेह, एकता आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, तसेच भारतीय संस्कृतीतील समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन व्हावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गडचिरोलीतील सर्व नागरिकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व..

या धार्मिक कार्यक्रमाला गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, नगरसेवक सागर निंबोरकर, सामाजिक नेते शेखर साळवे, प्रकाश निकुरे, राजुभाऊ मल्लेलवार, निलेश बोमनवार, मनीष फुस्कुटे, सोनू ब्राह्मणवाडे, किशोर मगरे, हिवसे सर, रुपेश टेपलवार, मनिष बानबले, मुकेश बरदालकर, अभि म्हशाखेत्री, योगेश जेंगठे, प्रमोद खोब्रागडे, रवि भंडागे आणि रवि कांबडे यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश..

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दुर्गामातेच्या आराधनेतून भक्ती, श्रद्धा आणि शक्तीची उपासना केली जाते. नवशक्ती दुर्गामाता उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवाच्या प्रारंभीच भाविकांची उपस्थिती आणि उत्साहातून धार्मिक परंपरेप्रती असलेली आस्था दिसून आली. अशा सार्वजनिक धार्मिक उत्सवांमुळे नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळते, सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो आणि नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचण्यास हातभार लागतो. दुर्गामातेच्या जयघोषात आणि मंगलमय वातावरणात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

Comments (0)
Add Comment