खाली दबा धरलेला वाघ, फांदीवर अख्खी रात्र… गडचिरोलीत २३ वर्षीय गुराख्याने मृत्यूला दिली हुलकावणी!

मरपल्लीच्या जंगलात १२ तासांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; पहाटे वाघ परतताच युवक सुखरूप गावात परतला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : वाघाच्या जबड्यातून सुटणे केवळ अशक्य मानले जाते; परंतु झाडाखाली ठाण मांडून बसलेला साक्षात मृत्यू आणि झाडाच्या फांदीला घट्ट पकडून काढलेली भयाण रात्र… अशा अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीत एका २३ वर्षीय आदिवासी युवकाने दाखवलेले धैर्य अखेर त्याच्या जीवाचे रक्षक ठरले. एटापल्ली तालुक्यातील मरपल्लीच्या जंगलात तब्बल १२ तास चाललेल्या या थरारात महेंद्र भाऊजी दुर्वा या युवकाने हिंमत न गमावता मृत्यूला यशस्वी चकवा दिला.

अचानक समोर आला वाघ, झाडावर चढून वाचवला जीव

शनिवारी दुपारी महेंद्र हा गावातील काही महिलांसोबत शेतालगतच्या वनपरिक्षेत्रात गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घनदाट झाडीतून अचानक एक पट्टेरी वाघ त्यांच्या दिशेने चालून आला. अचानक ओढवलेल्या या संकटात क्षणाचाही विलंब न लावता महेंद्रने चपळाईने जवळच्या झाडावर चढून स्वतःचे प्राण वाचवले. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड करून महेंद्रला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अगदी झाडाखालीच वाघ दबा धरून बसल्याने हालचाल करणे किंवा प्रत्युत्तर देणेही जीवावर बेतणारे होते; त्यामुळे महेंद्र झाडावरच स्तब्ध बसून राहिला.

गावात धाकधूक, रात्रभर शोधमोहीम…

संध्याकाळी महिला गावात परतल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. महेंद्र घरी न परतल्याने गावात चिंतेचे सावट पसरले. रात्रभर कुटुंबीय आणि ग्रामस्थांची घालमेल सुरू होती. रविवारी पहाटे ५ वाजताच गावातील तब्बल ८० ते ८५ ग्रामस्थांनी एकत्र येत लाठ्या-काठ्यांसह जंगलात महेंद्रच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली.

पहाटे वाघ जंगलात निघून गेला अन्…

शनिवारी दुपारी ४ वाजल्यापासून रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत वाघ झाडाखालीच तळ ठोकून होता. महेंद्रवर नजर ठेवून बसलेल्या वाघाची हालचाल मंदावल्यानंतर आणि पहाटेच्या अंधारात तो जंगलाच्या आत निघून गेल्याची खात्री पटल्यावरच महेंद्र झाडावरून खाली उतरला. जंगलातून वाट काढत जवेलीमार्गे सकाळी ६ वाजता तो थेट मरपल्ली गावात सुखरूप दाखल झाला. महेंद्रला सुखरूप समोर पाहताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

 “दुपारी चारपासून पहाटेपर्यंत वाघाची तीक्ष्ण नजर माझ्यावरच रोखलेली होती. खाली साक्षात मृत्यू दबा धरून बसला होता आणि मी फांदीला पकडून थरथरत्या हातांनी रात्र काढली. महिलांचे आवाज कानावर येत होते, पण तोंडातून आवाज काढला असता तर वाघाने एका झेपेत शिकार केली असती. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही.”

 — महेंद्र दुर्वा (घटनाग्रस्त युवक)

Gadchiroli tiger issueTiger haunting
Comments (0)
Add Comment