बनावट जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन खनिकर्म निधी लाटण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधून अटक

भाजपा मधून केली होती हकालपट्टी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्हा खनिकर्म प्राधिकरणांतर्गत होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निधीवर डोळा ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीचा वापर करून प्रशासकीय मान्यतेचे पत्र तयार केल्याप्रकरणी चामोर्शी नगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने पिपरे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बनावट पत्रातून निधी मंजुरीचा प्रयत्न उघड…

२२ जून रोजी जिल्हा खनिकर्म कार्यालयातील ऑपरेटर राहुल रेवाडे यांना गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक लीलाधर भरडकर यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेचा पीडीएफ आदेश प्राप्त झाला होता. संबंधित कामांना मंजुरी मिळाली आहे का, अशी विचारणा भरडकर यांनी रेवाडे यांच्याकडे केली. मात्र, कार्यालयाकडून अशी कोणतीही मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले.यानंतर सदर पत्र जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तपासणीअंती हे पत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार पाठवली.

गडचिरोली पोलिसांकडून गुन्हा दाखल…

या प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३३७, ३३८, ३४० आणि ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध सुरू केला.तपासादरम्यान बनावट प्रशासकीय मान्यतेचे पत्र तयार करून पाठविण्यामागे आशिष पिपरे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ४ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.

तपासात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता…

या प्रकरणात केवळ एकाच व्यक्तीचा सहभाग आहे की यामागे आणखी काही व्यक्तींचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली, आर्थिक व्यवहार झाले का, मोबाईल संपर्कातून कोणकोणाशी संवाद झाला, यासह विविध बाबींची चौकशी केली जात आहे.पोलिस तपासात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून, प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय दबावाशिवाय तपास पुढे गेल्यास या प्रकरणातील मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे करीत आहेत…

जिल्हाधिकारी गडचिरोलीनगर पंचायत चामोर्शीपोलिस अधीक्षक गडचिरोली
Comments (0)
Add Comment