लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
देसाईगंज (गडचिरोली): महाराष्ट्रात सुगंधित आणि स्वादयुक्त तंबाखू उत्पादनांच्या वाहतूक व विक्रीवर कायद्याने पूर्णपणे बंदी असतानाही, गडचिरोली जिल्ह्याची मुख्य व्यापारी बाजारपेठ असलेल्या देसाईगंज (वडसा) शहरात ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. लगतच्या छत्तीसगड आणि गोंदिया सीमाभागातून दररोज लाखोंच्या घरात बनावट व विषारी रासायनिक तंबाखूची तस्करी शहरात केली जात असून, संबंधित नियंत्रण यंत्रणांच्या संशयास्पद ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे नागरिकांच्या, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप आता जोर धरू लागला आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज हे सध्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे मोठे ट्रान्झिट हब बनले आहे. आंतरराज्यीय टोळ्यांशी हातमिळवणी करून गोंदिया-कोहमारा तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून कोरची मार्गे छुप्या पद्धतीने या मालाची मोठी खेप दररोज शहरात पोहोचवली जाते. स्थानिक पातळीवर काही ठरावीक दलाल व वितरकांचे नेटवर्क सक्रिय असून, नामांकित ब्रँड्सचे हुबेहूब स्टिकर्स लावून बनावट रासायनिक पावडरयुक्त तंबाखू किराणा दुकाने आणि पानटपऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. या संपूर्ण रॅकेटची दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक आणि शहरात सुरू असलेले खुले वितरण स्थानिक तपास यंत्रणांना कसे दिसत नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधित विभाग आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत नियमित ‘आर्थिक रसद’ पोहोचवली जात असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने या हप्तेखोरीत नेमके कोण गुंतले आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या बनावट उत्पादनांमध्ये मिसळली जाणारी रसायने थेट कर्करोगाला निमंत्रण देणारी असून शहरात तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा केवळ महसूल बुडवण्याचा किंवा तस्करीचा प्रश्न नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाची गोपनीय चौकशी करून स्थानिक वितरक, सीमाभागातील पुरवठादार आणि त्यांना मूकसंमती देणाऱ्या जबाबदार घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिकांकडून केली जात आहे. आता वरिष्ठ प्रशासन या रॅकेटचे पाळेमुळे खणून काढणार की कागदी घोडेच नाचवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.